गेल्यावेळी शाहू छत्रपतींच्या पाया पडायला का राजवाडयावर गेला होता? सतेज पाटीलांचा संजय मंडलिकांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 11:52 AM2024-04-26T11:52:55+5:302024-04-26T11:53:09+5:30

तुमच्यासाठी गेल्यावेळी जीवाचे रान केले, तुमचे कर्तृत्व काय?

Last time Shahu went to the palace to fall at the feet of Chhatrapati, Satej Patil question to Sanjay Mandalik | गेल्यावेळी शाहू छत्रपतींच्या पाया पडायला का राजवाडयावर गेला होता? सतेज पाटीलांचा संजय मंडलिकांना सवाल

गेल्यावेळी शाहू छत्रपतींच्या पाया पडायला का राजवाडयावर गेला होता? सतेज पाटीलांचा संजय मंडलिकांना सवाल

गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) : गेल्या निवडणूकीत शाहू छत्रपतींच्या पाया पडायला राजवाडयात का गेला होता? माझ्याकडे तो फोटोही आहे, तो व्हायरल करू का? तुमच्यासाठी गेल्यावेळी जीवाचे रान केले. ५ वर्षे तुम्ही काय केले? तुमचे कर्तृत्व काय? असा सवाल कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी महायुतीचे खासदार संजय मंडलिक यांना विचारला.

महागाव (ता.गडहिंग्लज) येथे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अप्पी पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हयाची अस्मिता,स्वाभिमान आणि आपल्या कृतीतून देशाला समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षि शाहू महाराज यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणून या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सतेज पाटील म्हणाले, 'करवीरच्या गादी'ची पुण्याई मोठी आहे, कोल्हापूर जिल्हयावर गादीचे अनंत उपकार आहेत.त्यामुळे गादीचा सन्मान राखा, गादीवर बोलू नका. हवे तर माझ्यावर बोला, मी उत्तर द्यायला समर्थ आहे, असे खासदार संजय मंडलिक यांना सांगितले होते. तरिही त्यांनी गादीचा मुद्दा उपस्थित केला. परंतु, मी राजकारणात कसलेला पैलवान आहे. शडडू ठोकलाय, माती अंगावर घेतली आहे, चितपट केल्याशिवाय राहणार नाही.

अप्पी पाटील यांनी आतापर्यंत स्वतःसाठी ताकद दाखवली होती. परंतु, भरदुपारच्या उन्हात विराट मेळावा घेऊन त्यांनी शाहु छत्रपती यांच्यासाठी आपली ताकद दाखवली. महिनाभरातील गडहिंग्लज विभागातील हा सर्वात मोठा मेळावा आहे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी मेळाव्याचे संयोजक जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांचे कौतुक केले.

शाहू छत्रपती म्हणाले, स्वातंत्र्यलढ्यात जनसंघ, भाजप कुठे होता? 'काँग्रेस'नेच देशाला स्वातंत्र्य, लोकशाही व संविधान दिले. 'इंडिया आघाडी'च ते टिकवेल. निवडणुकीतील वातावरण कितीही तापले तरी काही फरक पडणार नाही.

यावेळी गोपाळराव पाटील, किसनराव कुराडे,अप्पी पाटील, सुनील शिंत्रे, डॉ. नंदिनी बाभुळकर, स्वाती कोरी, दिलीप माने रामराज कुपेकर, अभिषेक शिंपी, गिरीजादेवी शिंदे - नेसरीकर, अखलाक मुजावर, यांचीही भाषणे झाली. मेळाव्यास  डॉ.संजय चव्हाण, हणमंतराव पाटील, इंद्रजीत पाटील, अमर चव्हाण, संभाजीराव देसाई-शिरोलीकर, शिवाजी खोत आदी उपस्थित होते. कॉ.संजय तर्डेकर यांनी प्रास्ताविक केले. सरपंच प्रशांत शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: Last time Shahu went to the palace to fall at the feet of Chhatrapati, Satej Patil question to Sanjay Mandalik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.