"छत्रपती कुटुंबाचे घराण्याच्या नावाला साजेशे काम नाही; शाहू महाराजांचे खरे वारसदार समरजीत घाटगेच"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 09:52 IST2024-04-21T09:50:36+5:302024-04-21T09:52:03+5:30
वीरेंद्र मंडलिक यांचे खळबळजनक विधान, कोल्हापुरात गेल्या १५-२० वर्षांपूर्वी बंद पडलेली शाहू मिल त्यांना सुरू करता आलेली नाही.

"छत्रपती कुटुंबाचे घराण्याच्या नावाला साजेशे काम नाही; शाहू महाराजांचे खरे वारसदार समरजीत घाटगेच"
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाला साजेशे काम केले नसल्याचे खळबळजनक विधान याच मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी शनिवारी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कागल तालुक्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात बोलताना वीरेंद्र यांनी शाहू महाराजांच्या नावाला साजेशे काम जनक घराणे म्हणून स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे व समरजीत घाटगे यांनी केले. मात्र, हे काम छत्रपती घराण्याला करता आले नसल्याचे विधान केले. शाहू महाराजांच्या नावाने एकही उद्योग छत्रपती कुटुंबाचा नाही. कोल्हापुरात गेल्या १५-२० वर्षांपूर्वी बंद पडलेली शाहू मिल त्यांना सुरू करता आलेली नाही. त्यामुळे शाहू महाराजांचे खरे जनक वारसदार समरजीत घाटगेच आहेत, असा दावाही मंडलिक यांनी केला. वीरेंद्र यांच्या या विधानाने पुन्हा नवा वाद निर्माण झाला. गत आठवड्यात संजय मंडलिक यांनीही आताचे शाहू महाराज छत्रपती घराण्याचे थेट वारसदार नसून,
जनता वारसदार असल्याचे सांगत वाद ओढावून घेतला होता.
वीरेंद्र मंडलिक यांचे वय पाहता ही अशोभनीय टीका आहे. समोरचे उमेदवार कोण आहेत, त्यांच्यावर टीका करण्याची आपली योग्यता आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे कोणते मुद्देच नाहीत. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला हवी. गादी, वारस यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे समरजित घाटगे यांनी या लोकांपासून सावध राहावे. -संजय पवार, उपनेते, उद्धवसेना