Kolhapur Municipal Election 2026: शहरातील महिला, विद्यार्थ्यांसाठी केएमटी मोफत; सतेज पाटील यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:43 IST2026-01-09T17:42:59+5:302026-01-09T17:43:50+5:30
काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur Municipal Election 2026: शहरातील महिला, विद्यार्थ्यांसाठी केएमटी मोफत; सतेज पाटील यांची घोषणा
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सर्व महिलांसाठी आणि शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी केएमटीचा बस प्रवास पूर्णपणे मोफत करणार असल्याची घोषणा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बुधवारी करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा खासदार शाहू छत्रपती व काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला.
महिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी मोफत केएमटी प्रवास, महिलांसाठी आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टीकडून ऑडिट करून उत्तम रस्ते, जयप्रभा स्टुडिओ महापालिकेच्या ताब्यात घेतला जाईल, या मुद्यांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे. तत्पूर्वी खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, उद्धवसेनेचे विजय देवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस व उद्धवसेनेच्या सर्व ८१ उमेदवारांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.
शहरात राहणाऱ्या महिला, भगिनी आणि पर्यटक महिलांसाठी प्रत्येक प्रमुख ठिकाणी 'मिशन मोड'वर स्वच्छ, सुरक्षित आणि अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारणार असून महिलांसाठी फिरते पिंक स्वच्छतागृह हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे.
जनतेशी वचनबद्धता...
‘कोल्हापूर कस्स्... तुम्ही म्हणशीला तस्सा’ हीच टॅगलाइन घेऊन जाहीरनाम्याची मांडणी केली असून तो महाराणी छत्रपती ताराराणी यांना अर्पण करण्यात आला आहे. राजवैभव थोर असेल; पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धतता त्या वैभवाहूनही थोर आहे, असे राजर्षी शाहू छत्रपती यांचे विधान या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी आहे.
नवीन केएमटी बस घेणार
कोल्हापुरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नवीन केएमटी बस घेणार असल्याचे या जाहीरनाम्यात नमूद केले आहे. नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षित प्रवासासाठी महिलांसाठी 'पिंक बस' सेवा सुरू करण्यात येणार आहे.
सुरक्षित पाळणाघरे
नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी शहराच्या विविध भागांत महापालिकेच्या नियंत्रणाखाली १० सुरक्षित आणि आधुनिक पाळणाघरे उभारणार. कोल्हापूर शहरातील दोन लाख ६० हजार महिलांना आरोग्य कवच, अचानक आलेल्या अति गंभीर आजारावर वैद्यकीय उपचारासाठी तातडीची दहा हजार रुपयांची मदत. १८ ते ३० वयोगटातील युवतींना आत्मनिर्भर करण्यासाठी 'कौशल्य प्रशिक्षण केंद्रे' उभारणार.
राजर्षी शाहू नॉलेज सेंटर, फिजिओथेरपीची आणखी दोन सेंटर सुरू करणार, महिलांसाठी आरोग्यासाठी एकाच छताखाली सर्वसमावेशक तपासणी केंद्र उभारणार, 'कोल्हापूर इनोव्हेशन हब' सुरू करणार, उपनगरातील फेरीवाल्यांना हक्काची आणि निश्चित जागा मिळवून देण्यासाठी अद्ययावत 'स्ट्रीट व्हेंडिंग झोन' विकसित करणार. तांबडा-पांढरा, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी चटणी आणि कोल्हापुरी मिसळ यासारख्या उत्पादनांचे आयपीआर, ट्रेडमार्क आणि कॉपीराइटद्वारे कायदेशीर संरक्षण करणार, सर्व सोयींयुक्त अशी महापालिकेची नवीन भव्य प्रशासकीय इमारत उभारणार, छत्रपती शाहू महाराजांशी संबंधित सर्व स्थळांना जोडून 'हेरिटेज स्ट्रीट' विकसित करणार, सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार होतील यासाठी 'थर्ड पार्टी ऑडिट' बंधनकारक, प्रमुख चौकांमध्ये आणि गर्दीच्या रस्त्यांवर उड्डाणपूल उभारण्यात येतील.
'मॉडेल वस्ती' संकल्पना
शहरातील सर्व ७० झोपडपट्ट्यांमध्ये रस्ते, पाणी, गटार, वीज अशा सर्व मूलभूत सुविधा पुरवून मातंग वसाहत, रमणमळा, कनाननगर, सदर बाजार, विचारे माळ, इंदिरा नगरे झोपडपट्टी, शिवाजी पार्कमधील वस्ती, सिद्धार्थनगर, घिसाड गल्ली, वारे वसाहत, गंजीमाळ, टाकाळा खण येथे मॉडेल वस्ती ही संकल्पना राबवणार आणि पक्क्या घरांसाठी योजना तयार करणार.
ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊन शहराची हद्दवाढ
कोल्हापूरच्या सुनियोजित विकासासाठी शहराची हद्दवाढ करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासात घेत राज्य सरकारकडे सकारात्मक पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावणार.
जयप्रभा स्टुडिओ ताब्यात घेणार
कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा गौरवशाली वारसा असलेला जयप्रभा स्टुडिओ महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार.