Kolhapur Municipal Election 2026: ‘जनसुराज्य’चे पाच म्हणता पंचवीस उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:13 IST2025-12-31T12:11:36+5:302025-12-31T12:13:43+5:30
भाजप, शिंदेसेना, काँग्रेसमधील बंडखोरी पडली पथ्यावर

Kolhapur Municipal Election 2026: ‘जनसुराज्य’चे पाच म्हणता पंचवीस उमेदवार रिंगणात
कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ऐनवेळी निवडणूक रिंगणात उतरलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडे सोमवारी सायंकाळपर्यंत पाच उमेदवार होते, परंतु शिंदेसेना, भाजप व काँग्रेसकडून उमेदवारी नाकारलेल्या २५ उमेदवारांनी जनसुराज्य पक्षाकडून तिकीट घेऊन त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीसह काँग्रेसमधील बंडखोरी ‘जनसुराज्य’च्या पथ्यावर पडली असून, यातील काही उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर आव्हान उभे करु शकतील, अशा क्षमतेचे आहेत.
महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी उडी घेतली. कोणतीही पूर्वतयारी नसताना उमेदवारी अर्ज दाखल होण्यास काही तासांचा अवधी असताना पक्षाच्या नेत्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी केवळ पाच उमेदवारांनी मुलाखती दिल्या. अन्य पक्षांत होणाऱ्या बंडखोरीकडे जनसुराज्यच्या नेत्यांचे लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे भाजप, शिंदेसेना, काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आणि जनसुराज्यने या बंडखोरांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले. जनसुराज्यमधील इनकमिंग मंगळवारी सकाळपर्यंत सुरू होती. सकाळी अकरानंतर पक्षाने २६ उमेदवारांना एबी फॉर्म दिले.
वाचा : शिंदेसेनेतून आमदार पुत्र, माजी आमदार पुत्र, पुतणे यांच्यासह ३० जण रिंगणात
शिंदेसेनेतून बंडखोरी केलेल्या रमेश खाडे, प्रवीण लिमकर, कुणाल शिंदे, रणजित मंडलिक, रमेश पुरेकर, रशीद बागवान यांना, भाजपमधून बंडखोरी केलेल्या माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, कमलाकर भोपळे यांना, तर काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या अक्षय जरग यांना जनसुराज्य पक्षाने उमेदवारी दिली आहे. पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी स्वत: या उमेदवारांना फोन करुन आपल्या पक्षाची उमेदवारी घेण्याची विनंती केली होती. या घडामोडी सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.
वाचा : इचलकरंजीत भाजपमध्ये बंडखोरी, ७ पक्ष रिंगणात
भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटातील बंडखोरी झालीच तर त्यांना पर्याय असावा म्हणून जनसुराज्य पक्षाने निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मंगळवारी जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली असता बहुतांशी उमेदवार हे भाजप, शिंदेसेनेतून बंडखोरी केलेले आहेत. त्यामुळे या चर्चेला आधार मिळाला आहे.