Kolhapur Election 2026: कोल्हापूर महानगरपालिकेच्या दहा प्रभागांत हायव्होल्टेज लढती, आमदारपुत्राविरोधात रिक्षाचालक; कुठं, कुणाशी होणार लढत..वाचा
By पोपट केशव पवार | Updated: January 1, 2026 13:14 IST2026-01-01T13:09:59+5:302026-01-01T13:14:04+5:30
Kolhapur Municipal Election 2026: सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर या लढतीच्या झलक पाहायला मिळत आहेत

Kolhapur Election 2026: कोल्हापूर महानगरपालिकेच्या दहा प्रभागांत हायव्होल्टेज लढती, आमदारपुत्राविरोधात रिक्षाचालक; कुठं, कुणाशी होणार लढत..वाचा
पोपट पवार
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत २० प्रभागांमध्ये सगळ्याच पक्षांनी सक्षम अन् बलवान उमेदवार दिले असले तरी शहरातील दहा प्रभागांमधील दुरंगी लढती या सर्वात हायव्होल्टेज असतील. कोल्हापूर उत्तर विधानसभा लढवलेले माजी नगरसेवक राजू लाटकर पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक ४ मधून महापालिकेच्या रणांगणात उतरले आहेत. येथे भाजपने संजय निकम यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवार सक्षम असल्याने येथे निकराचा सामना होणार आहे.
काँग्रेसमधून शिंदेसेनेचा धनुष्यबाण ताणलेले स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्याविरोधात काँग्रेसने राहुल माने यांना मैदानात उतरवले आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील ही लढत जिल्ह्यातील सर्वात चर्चेची ठरणार आहे. सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर या लढतीच्या झलक पाहायला मिळत आहेत.
प्रभाग क्रमांक १२ मधील लढतीनेही महापालिकेच्या निवडणुकीत चुरशीचे रंग भरले आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्याविरोधात काँग्रेसने माजी नगरसेवक ईश्वर परमार हा अनुभवी चेहरा दिला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी फरास यांच्यासाठी सारी ताकद पणाला लावली असली तरी आमदार सतेज पाटील यांनीही परमार यांच्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केल्याने बारामधील ही लढत कुणाचे ‘बारा’ वाजवणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
विशेष म्हणजे याच प्रभागात माजी महापौर हसिना फरास यांच्यावर राष्ट्रवादीने पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने स्वालिया बागवान यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठीही मंत्री मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या पत्नी जयश्री चव्हाण यांना काँग्रेसने प्रभाग क्रमांक ११ मधून उमेदवारी दिली आहे. येथे राष्ट्रवादीच्या यशोदा मोहिते यांच्याशी त्यांची लढत असेल.
आमदारपुत्र विरुद्ध रिक्षाचालक
आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर हे प्रभाग क्रमांक ७ मधून रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात उद्धवसेनेने राजेंद्र जाधव या सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिले आहे. जाधव हे रिक्षाचालक आहेत. त्यामुळे या लढतीने आमदारपुत्र विरुद्ध रिक्षाचालक असे स्वरूप घेतले आहे.
समर्थ, नाईकनवरे, चव्हाण तिरंगी सामना
प्रभाग क्रमांक १४ मध्ये शिंदेसेनेने एकमेव माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांच्या उमेदवारीला कात्री लावत माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांना उमेदवारी दिली आहे. नाईकनवरे यांच्या विरोधात काँग्रेसने अमर समर्थ यांच्यावर विश्वास दाखवला आहे. येथे चव्हाण यांनी अपक्ष रिंगणात उडी घेतल्याने दुरंगी लढत तिरंगी बनली आहे.
दहामध्ये ‘कुणाचं काय ठरलंय’
ज्या जागेसाठी काँग्रेस आणि उद्धवसेनेत बरीच ताणाताणी झाली त्या प्रभाग क्रमांक १० मध्ये उद्धवसेनेने जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचे चुलत बंधू राहुल इंगवले यांना उमेदवारी दिली आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने माजी नगरसेवक महेश सावंत यांना तिकीट दिले आहे. विशेष म्हणजे ज्यांच्यासाठी काँग्रेस अडून बसली होती त्या अक्षय जरग यांनी वंचितचा झेंडा खांद्यावर घेतल्याने या प्रभागातही तिरंगी सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे जगर समर्थकांच्या स्टेटसलसा ‘आपलं ठरलंय’ ही टॅगलाइन झळकत असल्याने हा सामना कुणी ठरवला होता हे निकालानंतरच उमगणार आहे.
देसाई-पिसे, चौगुले-लोंढे बिगफाइट
प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपचे रिंकू देसाई, तर काँग्रेसचे नंदकुमार पिसे, प्रभाग १ मध्ये काँग्रेसचे सचिन चौगुले विरुद्ध शिंदेसेनेचे कृष्णा लोंढे, प्रभाग २ मध्ये शिंदेसेनेचे स्वरूप सुनील कदम विरुद्ध काँग्रेसचे नागेश पाटील या लढतीही रंगतदार होणार आहेत.