Kolhapur: घरोघरी फिरून २० रुपयांत आरोग्य तपासणी; इचलकरंजीत सहा जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:04 IST2025-09-19T12:03:48+5:302025-09-19T12:04:14+5:30
महापालिका आरोग्य विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

Kolhapur: घरोघरी फिरून २० रुपयांत आरोग्य तपासणी; इचलकरंजीत सहा जणांवर गुन्हा दाखल
इचलकरंजी : कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा परवाना नसताना रत्नोत्रय आयुर हेल्थ केअर उचगाव (ता. करवीर, जि. कोल्हापूर) या नावाने नागरिकांची आरोग्य तपासणी व औषध विक्री करणाऱ्या तीन महिलांसह सहा जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार इचलकरंजी येथील पि. बा. पाटील मळ्यात सुरू होता. महापालिका आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
गणेश शशिकांत बारटक्के (रा. मोरेवाडीनगर), रवीराज रामचंद्र कवाळे (रा. राजारामपुरी पहिली गल्ली), तेजस विरुपाक्ष जंगम (रा. वाशी नाका), वनिता अशोक पोवार (रा. टेंबलाईवाडी), तंझीला तौफिक रुंकडी, सायली शुभम पाटील (दोघी रा. उचगाव, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोग्य सल्लागारांची नावे आहेत.
पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिलेली माहिती अशी, पि. बा. पाटील मळ्यात सोमवारी पाच ते सहा जण घरोघरी जाऊन महापालिकेकडून आलो आहोत, असे सांगून रत्नोत्रय आयुर हेल्थ केअर उचगाव अशा मजकुराची २० रुपये किमतीची आरोग्य तपासणीची पावती देऊन काही यंत्राद्वारे महिलांची तपासणी करीत होते तसेच औषधेही देत होते. याची माहिती महापालिकेला मिळाली होती. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. संगेवार व पथकाने येथे जाऊन पाहणी केली.
त्यावेळी संशयित गणेश बारटक्के, रवीराज कवाळे, तेजस जंगम, वनिता पोवार, तंजिला रुकंडी, सायली पाटील आदी स्वत:चे ओळखपत्र गळ्यात अडकवून संस्थेच्या नावे २० रुपये किमतीची पावती देऊन रत्नलीव्ह सिरप, दिया अमृत, दिव्य आरोग्य, रत्न संजीवनी, रत्न फेम सिरप, नारी सखी सिरप, अधिररत्न सिरप, फेनेरील प्लस गोळ्या, त्रिफला गोळ्या, अधिरत्न गोळ्या, सुवर्णप्राश ड्रॉप, अर्थोरत्न टॅब्लेट अशी औषधे देत असल्याचे निदर्शनास आले. ज्यांची किंमत सुमारे ३ हजार ३१० रुपये होती.
संशयितांकडे आरोग्य विभाग तसेच महापालिकेकडून कोणतेही प्रमाणपत्र किंवा आरोग्य तपासणीसाठी उचित पदवी नसल्याचेही निष्पन्न झाले. शासन प्राधिकृत वैद्यक परिषदेकडेही कोणतीही नोंदणी नसल्याने मानवी जीविताची सुरक्षितता धोक्यात येईल, असे कृत्य केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पूनम माने करीत आहेत.