कोल्हापुरात बॅरिकेट्स तोडून पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन, गणेशभक्तांची अधिकाऱ्यांशी वादावादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:03 IST2025-09-03T12:02:24+5:302025-09-03T12:03:10+5:30
काही संघटनांचे पदाधिकारी आले अन्..

कोल्हापुरात बॅरिकेट्स तोडून पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन, गणेशभक्तांची अधिकाऱ्यांशी वादावादी
कोल्हापूर : शहरातील गटारे, कारखान्यांचे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळते तेव्हा पंचगंगेचे प्रदूषण होत नाही का, गणेशमूर्ती विसर्जन करतानाच पंचगंगा कशी प्रदूषित होते, असा सवाल करत गणेशभक्तांनी मंगळवारी प्रशासनाने लावलेल्या बॅरिकेट्स तोडून घरगुती गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीत विसर्जन केले. यावर काही संघटनांचे पदाधिकारी व प्रशासनामध्ये जोरदार वादावादी झाली. प्रशासनाकडून गणेशभक्तांना समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तरीही गणेशभक्तांनी पंचगंगा नदीतच विसर्जन केले.
कोल्हापूर महापालिकेकडून होणाऱ्या घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पंचगंगा नदी मार्गावर बॅरिकेट्स लावले होते. या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. मात्र, काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाने लावलेले बॅरिकेट्स काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला पोलिसांनी विरोध केला. यावेळी करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनीही कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
वाचा- कोल्हापूर जिल्ह्यात साडेतीन लाख गणेशमूर्ती दान, १४० टन निर्माल्य संकलन; पावसाची तमा न बाळगता बाप्पांना निरोप
मात्र, कार्यकर्त्यांनी त्यांना न जुमानता बॅरिकेट्स तोडून गणेशमूर्तींचे थेट पंचगंगा नदीत विसर्जन केले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू हेही घाटावर आले. त्यांनीही कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंचगंगा प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या इतर घटकांवर कारवाई न करता गणेशमूर्ती विसर्जनाला विरोध का? अशी विचारणाच कार्यकर्त्यांनी केली. यावेळी हिंदू एकताचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, संदीप सासणे, सुशील भांदिगरे, उदय भोसले, दीपक देसाई, शिवानंद स्वामी, सुनील सामंत उपस्थित होते.
काही संघटनांचे पदाधिकारी आले अन्..
पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या मार्गावर महापालिकेकडून बॅरिकेट्स लावून रस्ता अडवण्यात आला होता. या ठिकाणी मोठा पोलिस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही येथे कार्यरत होते. पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन केले तर नदी प्रदूषित होईल, असे सांगत हे अधिकारी गणेशभक्तांना गणेशमूर्ती पंचगंगा नदीत विसर्जित करू नका, असे सांगत होते. मात्र, सकाळी ११ वाजताच काही संघटनेचे पदाधिकारी आल्यानंतर त्यांनी थेट बॅरिकेट्स तोडून पंचगंगा नदीत मूर्तींचे विसर्जन करायला सुरुवात केल्यानंतर इतर भाविकांनीही पंचगंगेत मूर्ती विसर्जित केल्या.