कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर, रूपाराणी निकम ५१ व्या महापौरपदी विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:15 IST2026-02-07T12:14:51+5:302026-02-07T12:15:34+5:30

जनसुराज्यचे अक्षय जरग उपमहापौर : ४६ विरुद्ध ३५ मतांनी झाल्या निवडी 

For the first time in the history of Kolhapur BJP's Mayor, Ruparani Nikam takes office as the 51st Mayor | कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर, रूपाराणी निकम ५१ व्या महापौरपदी विराजमान

कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर, रूपाराणी निकम ५१ व्या महापौरपदी विराजमान

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम या कोल्हापूर महानगरपालिकेच्या ५१ व्या महापौरपदी शुक्रवारी विराजमान झाल्या. तर उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची निवड झाली. निकम आणि जरग यांच्या निवडीमुळे कोल्हापूर महानगरपालिका इतिहासात प्रथमच महायुतीचा झेंडा फडकला. महापालिकेत प्रथमच सत्ता आल्याने महायुतीच्या सर्व नेत्यांसह कार्यकर्त्यांनी वाद्याच्या गजरात गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी करत मोठा जल्लोष केला.

प्रथम वर्णानुक्रमाने रूपाराणी निकम यांच्यासाठी मतदान झाले. महायुतीच्या ४६ सदस्यांनी हात वर करून निकम यांना मतदान केले. त्यानंतर काँग्रेस आघाडीच्या सचिन मारुती शेंडे यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. तेव्हा त्यांच्या बाजूने ३५ नगरसेवकांनी मतदान केले. निकम यांना ११ मते जास्त पडल्याने त्या महापौरपदी निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही पंधरा मिनिटांचा अवधी देऊनसुद्धा कोणी माघार न घेतल्यामुळे अक्षय विक्रम जरग व दुर्वास कदम यांच्यासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले. यावेळी जरग यांना ४६ तर कदम यांना ३५ मते मिळाली. त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी जरग यांना ११ मतांनी विजयी झाल्याचे घोषित केले.

महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक ३४ जागा जिंकूनदेखील काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली. निवडणुकीत काँग्रेससोबत असणाऱ्या उद्धवसेनेला केवळ एकच जागा मिळाल्याने सत्तेपर्यंत पोहोचण्यात त्यांना संख्याबळाची अडचण आली. या निवडणुकीच्या निमित्ताने महाडिक घराण्याने महानगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले. आपल्या पक्षाचा महापौर करण्याचे भाजपचेही स्वप्न पूर्ण झाले. या निवडणुकीत भाजपला २६, शिंदेसेनेला १५, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला ४ आणि जनसुराज्य पक्षाला एक असे बळ महायुतीला मिळाले आहे.

शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेला ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने सुरुवात झाली. नगरसचिव सुनील बिदरे यांनी सभेचा अजेंडा वाचून दाखविल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. सर्वप्रथम महापौरसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. निवडणूक काळात महापालिकेसमोरील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. पोलिस बंदोबस्तही मोठा ठेवण्यात आला होता.

चंद्रकांतदादांचे स्वप्न पूर्ण

२०१४ मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडून केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आले होते. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २०१५ च्या महापालिका निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक, ताराराणी आघाडीचे सहकार्य घेत महापालिकेची सत्ता मिळविण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु त्यावेळी थोडक्यात सत्तेने हुलकावणी दिली. परंतु हेच स्वप्न बघत भाजपने तब्बल दहा वर्षांनी महापालिकेवर झेंडा फडकावीत भाजपच्या रूपाराणी निकम यांना महापौर केले.

Web Title : कोल्हापुर में भाजपा की निकम पहली महापौर; महायुति ने मनाई जीत

Web Summary : भाजपा की रूपाराणी निकम कोल्हापुर की पहली भाजपा महापौर बनीं। अक्षय जरग उप महापौर चुने गए। महायुति गठबंधन ने पहली बार कोल्हापुर नगर निगम में जीत हासिल की, जिसका उत्साहपूर्वक जश्न मनाया गया। सबसे अधिक सीटें जीतने के बावजूद कांग्रेस सत्ता हार गई। यह जीत चंद्रकांत पाटिल के दशक पुराने सपने को पूरा करती है।

Web Title : BJP's Nikam First Mayor of Kolhapur; Mahayuti Celebrates Victory

Web Summary : Ruparani Nikam of BJP became Kolhapur's first BJP mayor. Akshay Jarg was elected Deputy Mayor. The Mahayuti alliance secured its first-ever Kolhapur Municipal Corporation win, celebrated with enthusiasm. Congress lost power despite winning the most seats. This victory fulfills Chandrakant Patil's decade-long vision.