Kolhapur: चाळोबा हत्तीचा मोर्चा आता तेऊरवाडीत, गावात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:54 IST2025-05-27T12:54:17+5:302025-05-27T12:54:45+5:30
सुदैवाने त्याने कुणाचेही नुकसान केले नाही.

Kolhapur: चाळोबा हत्तीचा मोर्चा आता तेऊरवाडीत, गावात भीतीचे वातावरण
चंदगड : गेल्या काही दिवसांपासून होसूर, कामेवाडी भागात थैमान घातलेल्या चाळोबा हत्तीने आपला मोर्चा सोमवारी सकाळी चक्क तेऊरवाडी गावाकडे वळविला. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने त्याने कुणाचेही नुकसान केले नाही.
चाळोबा हत्ती महिनाभर होसूर घाट, कामेवाडी - चिंचणे, कर्नाटकातील बेकिनकरे, अतिवाड, महिपाळगडच्या पायथ्याशी वावरत होता. त्याने या भागात प्रचंड नुकसान केले असून, त्याच्या दहशतीमुळे परिसरात घबराट पसरली आहे. त्याच चाळोबा हत्तीने सोमवारी सकाळी आपला मोर्चा तेऊरवाडी गावाकडे वळविला.
गावच्या पुलाजवळून शिवारातून तो कमलवाडीकडे गेला. दरम्यान, त्याने कुणालाही इजा अथवा नुकसान केले नाही. पण, तो बिथरू नये, यासाठी त्यापासून लांब राहाणे, ही खबरदारी लोकांनी बाळगावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे, वनपाल जाॅनस्न डिसोझा यांनी केले आहे.
हल्ली वन्य प्राण्यांचे दर्शन तेऊरवाडीत वरचेवर घडते. त्यामध्ये गव्यांची संख्या अधिक आहे. ऊस हंगामात त्यांच्याकडून एकावर हल्लाही झाला होता. आता परत हत्ती गावाजवळ दिसल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.