खासदार बदला.. कोल्हापूर बदलेल, हाच जनतेचा हट्ट - सतेज पाटील
By विश्वास पाटील | Updated: April 10, 2024 14:21 IST2024-04-10T14:18:51+5:302024-04-10T14:21:32+5:30
'अजिंक्यतारा कार्यालयाचा २०१९ च्या निवडणुकीत रोल काय होता हे मंडलिक यांनी अनुभवले आहे'

खासदार बदला.. कोल्हापूर बदलेल, हाच जनतेचा हट्ट - सतेज पाटील
कोल्हापूर : खासदार बदला. कोल्हापूर बदलेल हाच कोल्हापूरच्या जनतेचा हट्ट आहे. त्यामुळे शाहू छत्रपती यांच्या निमित्ताने कोल्हापूरची अस्मिता संसदेत पोहोचेल असे प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिले. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील पक्ष फोडाफोडाचे पेटंट भाजपकडे असल्याची टीकाही त्यांनी केली.
शिंदेसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन समारंभात मंगळवारी भाजप नेते व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांना फोडाफोडीचे राजकारण करून आपला डाव साधायचा आहे असे ते म्हणाले होते. त्याला आमदार पाटील यांनी उत्तर दिले.
सतेज पाटील म्हणाले, फोडाफोडीचा जो काही पॅटर्न, पेटंट आहे तो सगळा भाजपकडे आहे. तो आम्हाला लागू होवू शकत नाही. ज्यांनी पाच वर्षात कांहीच केले नाही ते काँग्रेसच्या तालुक्यात कार्यालय काढण्याच्या निर्णयावर टीका करत आहेत. जे लोक आज आमच्या अजिंक्यतारा कार्यालयावर टीका करत आहेत, त्याच कार्यालयाचा २०१९ च्या निवडणुकीत रोल काय होता हे मंडलिक यांनी अनुभवले आहे.
राज ठाकरे यांचे असे कशामुळे परिवर्तन झाले की त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला अशी टिप्पण्णी त्यांनी केली. आमदार पाटील म्हणाले, महाराष्ट्रात भाजपकडून जे पक्षफोडाफोडीचे घाणरडे राजकारण झाले त्याविरोधात ठाकरे यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली होती. गेल्या लोकसभा निवडणूकीतील त्यांची भूमिकाही लोक अजून विसरलेले नाहीत. असे असताना त्यांनी घेतलेले भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांनाही मान्य होणारी नाही.