सतेज पाटील ठरताहेत ‘जिंकणारा ब्रॅण्ड’; कोल्हापूर लोकसभेसाठी सलग तीनवेळा दाखवला करिष्मा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 05:01 PM2024-06-05T17:01:33+5:302024-06-05T17:02:23+5:30

एकदा ठरलं की माघार नाहीच

After Shahu Chhatrapati's victory in the Kolhapur Lok Sabha elections, Satej Patil emerged as a winning brand in district politics | सतेज पाटील ठरताहेत ‘जिंकणारा ब्रॅण्ड’; कोल्हापूर लोकसभेसाठी सलग तीनवेळा दाखवला करिष्मा 

सतेज पाटील ठरताहेत ‘जिंकणारा ब्रॅण्ड’; कोल्हापूर लोकसभेसाठी सलग तीनवेळा दाखवला करिष्मा 

सचिन यादव

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत मागील सलग तीन निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी घेतलेली भूमिका निकाल फिरवणारी ठरली आहे. त्यांनी ज्यांना पाठिंबा दिला तोच उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या विजयानंतर जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील हे जिंकणारा ब्रॅण्ड म्हणून पुढे आले आहेत. एकदा एक भूमिका घेतली की तिला यश येण्यासाठी जीव तोडून राबणे आणि कोणत्याही स्थितीत यश खेचून आणण्याची त्यांची पद्धत आहे.

लोकसभेच्या २०१४च्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक, पुढे २०१९च्या लढतीत महायुतीचे संजय मंडलिक आणि आताच्या निवडणुकीत शाहू छत्रपती यांच्यासाठी त्यांनी ताकद पणाला लावली. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतही जयश्री जाधव यांना निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला.

लोकसभेच्या २०१४च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. त्यावेळी सतेज पाटील व महाडिक यांच्यात चांगले राजकीय संबंध नव्हते. कारण त्याच्या अगोदरच २००९च्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधून सतेज पाटील यांना महाडिक यांनी आव्हान दिले होते. परंतु हे आव्हान आमदार पाटील यांनी ५७६७ मतांनी परतवून लावले.

जिल्ह्याच्या राजकारणात हे दोन तरुण नेते एकत्र आले तर त्यातून विकासाला गती मिळू शकेल, असा दबाव या दोघांवरही आला. त्यामुळे आमदार पाटील यांनी एक पाऊल मागे घेत महाडिक यांच्याविरोधातील संघर्ष थांबवला व महाडिक यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रचाराची स्वतंत्र यंत्रणा राबवली. महाडिक यांची सक्षम उमेदवार ही प्रतिमा, महाडिक गटाची ताकद, दोन्ही काँग्रेस एकसंध होऊन लढवलेली निवडणूक आणि त्याला जोड म्हणून सतेज पाटील यांचे बळ या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून देशात मोदी लाट असतानाही कोल्हापूरने वेगळा निकाल दिला आणि महाडिक विजयी झाले.

लोकसभेला विजयी झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधून भाजपकडून अमल महाडिक उभे राहिले. त्यांनी सतेज पाटील यांचा पराभव केला. या पराभवानंतर सतेज पाटील-महाडिक यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा वाढला. त्याचे पडसाद विधान परिषद, राजाराम कारखाना व लोकसभेच्या निवडणुकीतही उमटले. खासदार महाडिक यांनाच पुन्हा राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. सतेज पाटील हे काँग्रेसचे आमदार असतानाही त्यांनी उघड बंड केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सांगूनही त्यांनी भूमिका बदलली नाही. आमचं ठरलंय ही टॅगलाइन काढून त्यांनी महाडिक यांच्या पराभवासाठी रात्रीचा दिवस केला. महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराची यंत्रणा हातात घेतली आणि त्यांच्या विजयात मोठा वाटा उचलला.

यावेळेच्या निवडणुकीत पुन्हा काहीसे तसेच चित्र तयार झाले. शिवसेना फुटल्यानंतर संजय मंडलिक शिंदे सेनेसोबत गेल्याने महाविकास आघाडीला उमेदवाराचा शोध घ्यावा लागला. सतेज पाटील यांनी पद्धतशीर सूत्रे हलवून शाहू छत्रपती यांनाच मैदानात उतरवले. त्यांच्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेत असलेली अस्मितेची भावना, स्वच्छ चेहरा, लोकांतील सहानुभूती फायदेशीर ठरल्या. मागच्या दोन निवडणुकीप्रमाणेच सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेससह स्वत:ची यंत्रणा ताकदीने राबवली आणि शाहू महाराज यांचा विजय खेचून आणला.

प्रत्येक तालुक्यात गट..

सतेज पाटील यांनी गोकुळ, जिल्हा परिषद, साखर कारखाने, बाजार समितीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात आपला भक्कम गट बांधला आहे. जिवाला जीव देणारे कार्यकर्ते उभे केले आहेत. या ताकदीचा त्यांना लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचे चित्र निकालानंतर दिसून आले.

जिगर आवडली..

भाजपच्या दबावापोटी मी मी म्हणणारे गप्प झाले असताना आमदार सतेज पाटील यांनी ही इर्षेने ही निवडणूक अंगावर घेऊन लढवली. त्यांची ही जिगर कोल्हापूरच्या जनतेला आवडली. आपण त्यांना बळ दिले पाहिजे, अशी भावना त्यातून निर्माण होत गेली.

Web Title: After Shahu Chhatrapati's victory in the Kolhapur Lok Sabha elections, Satej Patil emerged as a winning brand in district politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.