Ichalkaranji Municipal Election 2026: विरोधकांचे पैसे वाटल्याच्या कारणावरून पक्षाच्या दोन गटात हाणामारी, एकमेकाला बघून घेण्याची भाषा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:11 IST2026-01-15T11:09:35+5:302026-01-15T11:11:19+5:30
एकमेकाला बघून घेण्याची भाषा, गांधी कॅम्प परिसरात तणाव

Ichalkaranji Municipal Election 2026: विरोधकांचे पैसे वाटल्याच्या कारणावरून पक्षाच्या दोन गटात हाणामारी, एकमेकाला बघून घेण्याची भाषा
इचलकरंजी : विरोधकांचे पैसे वाटल्याच्या कारणावरून भाजपमधील कार्यकर्त्यांच्यात बुधवारी सायंकाळी गांधी कॅम्प चौकात जोरदार राडा झाला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी जमावाला पांगवले. मात्र, या दरम्यान माजी उपनगराध्यक्ष व एका माजी नगरसेविकेच्या पतीमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
भाजपच्या उमेदवाराचे कार्यकर्ते शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारासाठी पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून भाजपच्या कार्यकर्त्यांच्यातच जोरदार हाणामारी झाली. कपडे फाटेपर्यंत झालेल्या या हाणामारीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अचानक हातात बॅट व पट्टा घेऊन काही युवक बाहेर पडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. काय चालू आहे, हे कोणाला काय समजेना. गर्दी, जमाव आणि गोंधळ झाल्याची माहिती समजताच तातडीने पोलिस दाखल झाले. त्यानंतर त्यांनी जमावाला पांगवले.
Kolhapur Municipal Election Voting 2026: मतदानासाठी सकाळपासूनच रांगा, कोल्हापूरकरांचा दांडगा उत्साह; अनेक ठिकाणी यादी, बूथ घोळाने मतदारांची धावपळ
माजी उपनगराध्यक्ष व एका माजी नगरसेविकेच्या पतीमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. माजी उपनगराध्यक्षाने तुला गुलाल लावायला देत नाही, असे म्हटल्यानंतर तो वाद आणखीनच चिघळला. पोलिस व संबंधित कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत दोघांना बाजूला नेऊन वातावरण शांत केले. राखीव पोलिस दलाची तुकडीही तातडीने मागवून घेण्यात आली. सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे मुख्य रस्त्यावर संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली. रात्रभर पोलिसांची गाडी या परिसरात ठेवण्यात आली होती.