Kolhapur Municipal Election 2026: शोभा बोंद्रे, आनंद माने यांच्यासह ४८ उमेदवारांनी घेतली माघार, आज होणार चित्र स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:38 IST2026-01-02T12:37:36+5:302026-01-02T12:38:27+5:30
आज, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत

Kolhapur Municipal Election 2026: शोभा बोंद्रे, आनंद माने यांच्यासह ४८ उमेदवारांनी घेतली माघार, आज होणार चित्र स्पष्ट
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून गुरुवारी ४८ उमेदवारांनी त्यांची नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. आज, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर कोणत्या प्रभागात कशी निवडणूक होणार हे स्पष्ट होणार असले तरी बहुतेक सर्वच प्रभागात बहुरंगी लढती होतील, असे दिसते. महापालिकेसाठी मतदान १५ जानेवारीस, मतमोजणी १६ तारखेला होणार आहे.
गुरुवारी माघार घेतलेल्यांमध्ये माजी महापौर शोभा बोंद्रे, निलोफर आजरेकर, आनंद माने, विश्वजित मोहिते, सूरमंजिरी लाटकर, दिप्ती लिंग्रस, माधुरी मोहिते, महेश उत्तुरे, मुरलीधर जाधव, कस्तुरी खराडे, विक्रम जरग, प्रसाद शेटे, प्रमिला देशमुख, सरोज जाधव, शीतल मुळीक यांच्यासह ४८ उमेदवारांचा समावेश आहे. गुरुवारी माघार घेतलेल्यांमध्ये बहुतांशी डमी अर्ज भरले होते. त्यांच्या नातेवाइकांचे अर्ज वैध ठरल्यानंतर त्यांनी माघार घेतली.
आज, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे आज मोठ्या संख्येने नामनिर्देशनपत्रे मागे घेतली जातील. या निवडणुकीत किमान ५०० च्या आसपास उमेदवार निवडणूक लढवतील अशी अपेक्षा आहे.
माघारीनंतर प्रत्येक प्रभागातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार, काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट, आम आदमी, वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार निवडणूक लढवित आहेत. सर्वच मतदार संघात बहुरंगी लढती होणार आहेत.
माघार घ्या... ‘अजिंक्यतारा’वरून गेले निरोप
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरांची संख्या कमी असली तरी ज्या-ज्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज भरून पक्षासमोर आव्हान उभे केले आहे अशा अपक्षांना माघार घ्या, असे निरोप थेट ‘अजिंक्यतारा’वरून देण्यात आले आहेत. त्यामुळे हे बंडखोर नेत्यांचा आदेश मानणार की मैदानात उतरून पक्षासमोर आव्हान उभे करणार हे आज शुक्रवारी समजणार आहे.
महाविकास आघाडी म्हणून लढताना काँग्रेसने ७४ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर उद्धवसेनेला ६ जागा देतानाच प्रभाग क्रमांक २० मध्ये मनसेच्या राजू दिंडोर्ले यांना काँग्रेसने पुरस्कृत केले आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असतानाही पक्षाने चार दिवस आधीच आपले उमेदवार घोषित करून त्यांना कामाला लावले होते. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काही प्रमाणात बंडखोरांनी काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. मात्र, आमदार पाटील यांनी प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधल्याने या बंडखोरीला बऱ्यापैकी आळा बसला. काहींनी नेत्यांचे न ऐकता अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
प्रभाग क्रमांक ३ सह इतर चार ते पाच प्रभागांमध्ये काही कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. याचा फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला बसू नये, यासाठी आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी ‘अजिंक्यतारा’वर ठाण मांडत या बंडखोरांना माघार घेण्याचे निरोप धाडले आहेत. काही बंडखोरांशी चर्चा केल्यानंतर अर्ज माघारी घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे.