काँग्रेसचाच आवाज मोठा, सभागृहात दाखवा - शाहू छत्रपती; नूतन ३५ नगरसेवकांचा सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:31 IST2026-01-21T13:30:16+5:302026-01-21T13:31:18+5:30

शाहूंचा विचार कुणीच पुसू शकत नाही

35 victorious candidates of the Congress-Shiv Sena Uddhav Thackeray alliance were felicitated at the Kolhapur Municipal Corporation | काँग्रेसचाच आवाज मोठा, सभागृहात दाखवा - शाहू छत्रपती; नूतन ३५ नगरसेवकांचा सत्कार

काँग्रेसचाच आवाज मोठा, सभागृहात दाखवा - शाहू छत्रपती; नूतन ३५ नगरसेवकांचा सत्कार

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस-उद्धवसेनेच्या ३५ विजयी उमेदवारांची संख्या लहान नाही. महापालिकेत काँग्रेस हा सर्वाधिक मोठा असून त्यांचा आवाजच सर्वांत मोठा आहे, त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी हा आवाज सभागृहात त्याच ताकदीने दाखवून द्या, असे आवाहन खासदार शाहू छत्रपती यांनी काँग्रेस-उद्धवसेनेच्या विजयी नगरसेवकांना मंगळवारी केले.

महापालिकेत विजय मिळवलेल्या काँग्रेसच्या ३४, तर उद्धवसेनेच्या १ अशा ३५ नगरसेवकांचा सत्कार काँग्रेस कमिटीत खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कोल्हापुरी फेटा, पुष्पगुच्छ व संविधानाची प्रत देऊन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.

शाहू छत्रपती म्हणाले, महानगरपालिकेच्या निवडणुकीतून कोल्हापूरने एक वेगळी दिशा दिली आहे. येथील पुरोगामी विचार आजही बुलंद असल्याचा संदेश यातून दिला गेला आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी शहरातील प्रश्नांसाठी सभागृहात आपला आवाज कायमपणे बुलंद ठेवावा.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, विजयी नगरसेवकांनी सभागृहात विरोधकांची भूमिका सक्षमपणे पार पाडावी. ऋतुराज पाटील म्हणाले, महायुतीत नेत्यांची फौज होती. मात्र, महाविकास आघाडीत जनतेची फौज असल्याचे या निकालाने दाखवून दिले आहे.

स्वत:साठी एक मत मागितल्यामुळे घोळ

या निवडणुकीत काही उमेदवारांनी स्वत:साठी एक मत मागितल्यामुळे प्रभागांमधील चारही उमेदवार निवडून येण्यास अडचण झाली. ते एकटे सभागृहात जाऊन आपण सत्तेपर्यंत जाणार नाही, याची जाणीव त्यांना आता झाली असेल या शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी कानपिचक्या दिल्या.

थोडक्यातील पराभवाची खंत, मात्र, लढाई केल्याचा अभिमानही

काँग्रेसच्या काही जागा अगदी काठावर गेल्या आहेत. काही प्रभागांमध्ये थोडी ताकद लावली असती तर सत्ता मिळवली असती, सत्तेपर्यंत पोहोचता आले नसल्याची खंत सतेज पाटील यांनी बोलून दाखवली. महायुतीत तीन-तीन पक्षांची ताकद, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतानाही काँग्रेसने लढाई करुन ज्या पद्धतीने यश मिळवले त्याचा अभिमान असल्याचेही पाटील यांनी आवर्जून सांगितले.

सतेज पाटील महाराष्ट्राचे नवे वाघ

कोल्हापुरात काँग्रेसने मिळवलेल्या यशाची संबंध महाराष्ट्राने नोंद घेतली आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई निकाराने लढून तुम्ही काँग्रेसचा विचार अधिक बुलंद केला आहे. त्यामुळे सतेज पाटील हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नवे वाघ ठरले आहेत या शब्दांत शाहू छत्रपती यांनी सतेज पाटील यांचे कौतुक केले.

एकजूट, एकोपा कायम ठेवा

मालोजीराजे म्हणाले, महापालिकेत महायुतीचा विजय झाला असला तरी नैतिक विजय मात्र महाविकास आघाडीचाच झाला आहे. काही जागा थोडक्यात गेल्या. मात्र, ज्या पद्धतीने लढा दिला त्याने महाराष्ट्राला दिशा दिली आहे. त्यामुळे काँग्रेस-उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी हाच एकोपा, एकजूट कायम ठेवावी.

पराभूत उमेदवारांसोबत आज बैठक, त्यांना बळ देणार

जे उमेदवार पराभूत झाले आहेत त्यांनाही सोबत घेणार आहे. त्यांना विजयी नगरसेवकांनी बळ द्यावे, अशी सूचना करत आज बुधवारी पराभूत उमेदवारांसोबत बैठक घेऊन संवाद साधणार असल्याचे सतेज पाटील म्हणाले. १६ प्रभागांमध्ये काँग्रेसला एक तरी जागा मिळाली आहे. मात्र, चार प्रभागांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. या प्रभागांमधील विकासकामांची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकांना दिली जाणार असल्याचे सतेज पाटील यांनी जाहीर केले.

शाहूंचा विचार कुणीच पुसू शकत नाही

शाहूंचा पुरोगामी विचार कुणी पुसू शकत नाही हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निकालाने सिद्ध झाल्याचे मालोजीराजे म्हणाले. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढाईत काँग्रेसच्या बाजूने जनशक्ती उभी राहिली. नूतन नगरसेवकांनी जनशक्तीचा आवाज आता सभागृहात दाखवावा असे आवाहन त्यांनी केले.

Web Title : कांग्रेस का दबदबा: शाहू महाराज ने कोल्हापुर निगम में मजबूत आवाज उठाने का आग्रह किया

Web Summary : शाहू महाराज ने नवनिर्वाचित कांग्रेस पार्षदों से लोगों की चिंताओं को दृढ़ता से उठाने का आग्रह किया। कांग्रेस की जीत साबित करती है कि कोल्हापुर में प्रगतिशील विचारधारा मजबूत है। सतेज पाटिल की प्रशंसा की गई।

Web Title : Congress Dominates: Shahu Maharaj Urges Strong Voice in Kolhapur Corporation

Web Summary : Shahu Maharaj urged newly elected Congress corporators to strongly voice people's concerns. Congress's victory proves progressive ideology remains strong in Kolhapur. Satej Patil was praised.