LokSabha2024: मतदानादरम्यान कोल्हापुरात १४ जणांना उष्माघाताचा त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 13:32 IST2024-05-09T13:31:49+5:302024-05-09T13:32:24+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून उपचार

LokSabha2024: मतदानादरम्यान कोल्हापुरात १४ जणांना उष्माघाताचा त्रास
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभेच्या मतदानावेळी १४ जणांना उष्माघाताचा त्रास झाला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथक नियुक्त केले गेल्याने तातडीने या सर्वांवर उपचार करण्यात आले. जिल्ह्यात एकूण २,५४२ आरोग्य पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी दिली.
जिल्ह्यातील ३ हजार २१४ मतदान केंद्रांवर आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रथमोपचार सुविधा निर्माण करून देण्यात आल्या होत्या. या ठिकाणी ओआरएससह अन्य औषधाच्या गोळ्याही ठेवण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या होत्या. मतदान केंद्रांवर गरोदर माता आणि अपंगांसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती. मंगळवारी ४१ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी झाली तरी मतदारांना वर्गखोल्यांमध्ये बसण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली.
- मतदानादिवशी जिल्ह्यातील आरोग्य बूथ संख्या २५४२
- उपस्थित आरोग्य अधिकारी, कर्मचारी ३,२१४
- आरोग्यसेवेचा यांना झाला लाभ ६,६८३
- ओआरएस दिलेले लाभार्थी ६,५९६
- उष्माघाताचे रुग्ण १४
प्रत्येक तासाला एक ग्लास पाणी
जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढत असून यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी वॉटरबेल या संकल्पनेचा अवलंब करावा असे आवाहन केले आहे. त्यानुसार प्रत्येक तासाला एक ग्लास पाणी नागरिकांनी प्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.