भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:42 IST2025-12-29T12:42:06+5:302025-12-29T12:42:46+5:30
बैठकीनंतर सायंकाळी ४:२० च्या सुमारास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना टाळण्यासाठी आपला ताफा दुसऱ्या गेटवर मागवला. पत्रकार तिकडे धावताच ते मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडले

भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
जळगाव - भाजपा व शिंदेसेना यांच्यात रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत जागांच्या वाटपावरील मतभेदांमुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील अवघ्या १५ मिनिटांत बैठकीतून बाहेर पडले. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत राष्ट्रवादी (अजित पवार) च्या नेत्यांना चर्चेपासून दूर ठेवले होते. मंत्री गिरीश महाजन, महापालिका निवडणूक प्रमुख आमदार सुरेश भोळे, निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण आणि महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी दुपारी १:२० वाजता विश्रामगृहात दाखल झाले. २:१५ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील तिथे पोहोचले.
बैठकीत नेमके काय घडले?
बैठक सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांतच वातावरण तापले. मात्र, उभय नेत्यांमध्ये केवळ १५ मिनिटे चर्चा झाली आणि २.३६ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून बाहेर पडले. पत्रकारांनी त्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मौन पाळणे पसंत केले. त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण दोन वेळा बाहेर आले, फोनवर दीर्घ चर्चा केली आणि पुन्हा आत गेले, त्यामुळे पेच सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले.
महाजनांकडून सारवासारव
बैठकीनंतर सायंकाळी ४:२० च्या सुमारास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना टाळण्यासाठी आपला ताफा दुसऱ्या गेटवर मागवला. पत्रकार तिकडे धावताच ते मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडले, तर आमदार भोळे आणि चव्हाण मागील दरवाजाने निघून गेले. मात्र, पत्रकारांनी महाजन यांना हेरलेच. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अजून चर्चा सुरू आहे. लवकरच अंतिम निर्णय होईल. गुलाबराव पाटील यांच्या नाराजीचाही त्यांनी इन्कार केला.
५०-२०-५ चा फॉर्मुला?
भाजपा व शिंदे सेनेची बैठक फिस्कटल्याने वरिष्ठ पातळीवरून कुठल्याही परिस्थितीत निवडणूक महायुती म्हणूनच लढावी असे आदेश प्राप्त झाले. त्यानुसार भाजप ५०, शिंदे सेना २० व राष्ट्रवादी ५ असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्राकडून मिळाली. याबाबतची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे.
'पेच' नेमका काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीतील जागांच्या आकड्यांवरून मुख्य वाद आहे. मागील निवडणुकीत भाजपाने ५७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यामुळे आपल्या हक्काच्या जागा सोडण्यास भाजपा कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आहे. भाजपा शिंदेसेनेला १९, राष्ट्रवादीला २ ते ३ जागा देण्याच्या मानसिकतेत आहे. शिंदेसेना २५ जागांवर अडून बसली आहे. राष्ट्रवादीने किमान ६ जागांची 3 मागणी केली आहे. मात्र, आजच्या बैठकीला त्यांना निमंत्रितच करण्यात आले नाही.
प्रभाग ७ वरूनही संघर्ष
प्रभाग ७ मध्ये भाजपाच्या दीपमाला काळे यांचे तिकीट कापून ते राष्ट्रवादीच्या सोनल पवार यांना द्यावे, असा आग्रह संजय पवार यांनी धरला आहे. याला भाजपने विरोध केला आहे. यावर पिंटू काळे यांना बोलवून त्यांचे मत जाणून घेण्यात आले. अतुलसिंह हाडा यांनाही बोलावण्यात आले होते. विशाल त्रिपाठी, जितेद्र मराठे हे देखील यादी घेऊन विश्रामगृहावर पोहचले होते.