मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:36 IST2026-01-15T16:33:40+5:302026-01-15T16:36:46+5:30
Jalgaon Crime News: महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच जळगाव शहरातील एका भागात गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली.

मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
महापालिका निवडणुकीसाठी सकाळपासून जळगाव शहरात मतदान सुरू आहे. प्रक्रिया शांततेत सुरू असतानाच शहरातील पिंप्राळा परिसरात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. गोळीबाराच्या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि शहरात खळबळ माजली. या प्रकरणाबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली आहे.
जळगाव शहरामधील पिंप्राळा भागात आनंद मंगल नगर आहे. याच परिसरात दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. दोघांमध्ये सुरूवातीला शाब्दिक वाद झाला. त्यानंतर वाद टोकाला गेला आणि एका तरुणाने बंदूक काढून गोळीबार केला.
अचानक गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घाबरले. मतदानाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण पसरले. गोळीबाराच्या घटनेबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरल्यामुळे या परिसरात वातावरण तणावपूर्ण बनले होते.
गोळीबाराचे कारण काय?
गोळीबाराबद्दल माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.
पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी सांगितले की, "या गोळीबाराचा जळगाव महापालिका निवडणुकीशी किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाहीये. दोन गटांतील जुन्या वैयक्तिक वादातून ही घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे."
या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने जळगावमधील संवेदनशील भागातही पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मतदान केंद्रांवरील सुरक्षेवर विशेष लक्ष वाढवण्यात आले असून, गोळीबार करणाऱ्या आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू करण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.