मोठी बातमी: उन्मेष पाटलांच्या शिवसेना UBT प्रवेशाचा मुहूर्त ठरला; अंधारेंचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 16:08 IST2024-04-02T16:08:21+5:302024-04-02T16:08:56+5:30
Jalgaon Lok Sabha: जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी: उन्मेष पाटलांच्या शिवसेना UBT प्रवेशाचा मुहूर्त ठरला; अंधारेंचा गौप्यस्फोट
BJP Unmesh Patil ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारी घोषित करताना डावलल्याने नेत्यांच्या पक्षांतराची मालिका सुरू आहे. अशातच भाजपला उत्तर महाराष्ट्रात एक मोठा धक्का बसण्याची शक्यता असून जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पाटील यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही भेटीसाठी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी गेले होते. अशातच उन्मेश पाटील यांचा आमच्या पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून उद्या पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
सुषमा अंधारे यांनी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "उद्या दुपारी साडेबारा वाजता जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश आहे," अशी माहिती अंधारे यांनी दिली. तसंच ओरिजिनल शिवसेना परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
उद्या दु. 12.30 ला जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश..
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) April 2, 2024
ओरिजिनल शिवसेना परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत..🌹🪷💐@OfficeofUT@UnmeshPatilBjppic.twitter.com/aWMP3smOLO
तिकीट कापल्याने अनेक दिवसांपासून नाराज
जळगाव लोकसभा मतदारसंघात खासदार असलेल्या उन्मेष पाटील यांना भाजपने डावलत त्यांच्या जागी यंदा स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. तिकीट कापल्यापासून उन्मेष पाटील हे पक्षावर नाराज होते. तसंच ते अन्य पर्यायांच्याही शोधात होते. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जाणार आहे. त्यामुळे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात जाण्याच्या दृष्टीने गाठीभेटी घेतल्या होत्या. आज सकाळीच त्यांनी आधी संजय राऊत आणि नंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्यामुळेच त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याचे समजते.
दरम्यान, उन्मेष पाटील हे उद्या आमच्या पक्षात प्रवेश करतील असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं असलं तरी स्वत: पाटील यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "मी आपला मनापासून आदर करतो. आपले सगळे प्रश्न, शंका, सूचना याबाबत लवकरच सविस्तर बोलेन. आता बोलणे उचित होणार नाही. लवकरच मोकळेपणाने संवाद साधेन. मी आणि संजय राऊत संसदेत सोबत काम केलं आहे. आमची संजय राऊतांशी आणि सहकाऱ्यांशी कायम चर्चा होत असते. त्यानिमित्ताने संवाद साधायला आलो. प्रत्येक गोष्टीत आपण राजकारण म्हणून पाहू नका. राजकारणापलीकडे मैत्री जपली गेली पाहिजे. आताच्या घडीला मैत्री जपली जात नाही आणि ती मैत्री जपण्याचा हा प्रयत्न आहे. बाकी काही नाही," असं उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे.