अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या गुलाबराव देवकरांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 12:38 IST2024-12-09T12:38:03+5:302024-12-09T12:38:39+5:30
अजित पवार गट सत्तेत आल्यामुळे प्रवेश करण्याचा देवकरांचा प्रयत्न असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या गुलाबराव देवकरांना धक्का
NCP Gulabrao Devkar ( Marathi News ) : माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या संभाव्य प्रवेशाला अजित पवार गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. रविवारी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत देवकरांच्या प्रवेशाला विरोध असल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. बैठकीला अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जळगाव तालुकाध्यक्ष भूषण पवार, नाटेश्वर पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकारांना ज्ञानेश्वर महाजन यांनी सांगितले की, २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी च्या अधिकृत उमेदवार असलेल्या पुष्पा महाजन यांच्या विरोधात देवकर यांनी काम केले होते. यासह जर अजित पवार गटात प्रवेश करायचाच होता, तर मग विधानसभेच्या निवडणुकीआधीच्च करायला हवा, आता अजित पवार गट सत्तेत आल्यामुळे प्रवेश करण्याचा देवकरांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रवेश बंद असल्याचे लावले बॅनर...
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पक्ष व पक्ष कार्यालयात देवकर यांना प्रवेश बंद असे बॅनर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आले आहे. ज्या वेळेस पक्षात दोन गट निर्माण झाले, त्यावेळेस अजित पवार यांचा संघर्षाचा काळ होता त्यावेळेस देवकरांनी साथ दिली नाही. आता सत्ता आल्यामुळे देवकर पक्षात येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या पक्ष प्रवेशाला सर्व तालुका कार्यकर्त्यांकडून त्यांच्या प्रवेशाला आम्ही विरोध करु अशी भूमिका पक्षाचे तालुकाध्यक्ष भूषण पवार यांनी सांगितले.