ट्रेलरची दुचाकीला धडक, नवविवाहितेचा मृत्यू, पतीसह अन्य एक जखमी
By दिपक ढोले | Updated: June 2, 2023 19:50 IST2023-06-02T19:50:23+5:302023-06-02T19:50:50+5:30
अनिकेत हनुमंत कादगे (२८) व प्रमोद नामदेव घाटे (२२) हे दोघे जखमी झाले आहेत.

ट्रेलरची दुचाकीला धडक, नवविवाहितेचा मृत्यू, पतीसह अन्य एक जखमी
जालना : भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने नवविवाहिता ठार, तर पती व मावस दीर गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री टी-पॉइंटवरील उड्डाणपुलाजवळ शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. अश्विनी अनिकेत कादगे (२२, रा. रुई धानोरा, ता. गेवराई), असे ठार झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. अनिकेत हनुमंत कादगे (२८) व प्रमोद नामदेव घाटे (२२) हे दोघे जखमी झाले आहेत.
देऊळगावराजा येथील नातेवाइकाचे लग्न उरकून शुक्रवारी अनिकेत कादगे, त्यांची पत्नी अश्विनी कादगे व मावस दीर प्रमोद घाटे हे दुचाकी क्रमांक (एम.एच. २३ बी. जी. ६५२१) ने रुई धानोरा येथे जात होते. वडीगोद्री येथील उड्डाणपुलाजवळ आल्यावर छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलर क्रमांक (जी.जे.३६. एक्स ३३३३) ने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत अश्विनी कादगे या जागीच ठार झाल्या, तर पती व मावस दीर हे दोघे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच वडीगोद्री येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. या घटनेची माहिती कळताच महामार्गाचे मदतनीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामस्थांनी पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गोंदी पोलिसांनी ट्रेलर ताब्यात घेतले आहे. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात मयत अश्विनी कादगे यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.