राष्ट्रवादी नाराज, युतीतील नेत्यांची बैठक! जागा वाटपाचे कोडे आज सुटणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:00 IST2025-12-29T13:59:30+5:302025-12-29T14:00:20+5:30
नेत्यांच्या घोषणांकडे सर्वपक्षीय इच्छुकांचे लक्ष

राष्ट्रवादी नाराज, युतीतील नेत्यांची बैठक! जागा वाटपाचे कोडे आज सुटणार?
जालना: महायुतीत समाधानकारक जागा मिळत नसल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) गटातील नेत्यांनी नाराजीचा सूर आवळला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला वगळून भाजप, शिंदेसेनेची रविवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथे बैठक झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीनंतर सोमवारी युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेल्या मविआची रविवारी रात्री जागा वाटपांसाठी जालन्यात बैठक सुरू होती.
जालना महानगरपालिकेची प्रथमच निवडणूक होत असून, ही निवडणूक महायुतीने एकत्र लढावी, यासाठी बैठकांवर बैठका होत आहेत. महायुतीचे सूर जुळत नसल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी भाजप सोबत आली नाही, तर शिंदेसेनेसोबत युती करून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. मागील आठवड्यात झालेल्या महायुतीच्या तीन-चार बैठकांमध्ये अरविंद चव्हाण यांनी सहभाग नोंदविला होता. परंतु, मनपाच्या ६५ जागांपैकी कमी जागा वाट्याला येत असल्याने चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यातच शिंदेसेना आणि भाजपच्या नेत्यांची रविवारी रात्री युतीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक पार पडली.
यावेळी अरविंद चव्हाण अनुपस्थित होते. या बैठकीत जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार असून, सोमवारी युतीच्या अधिकृत घोषणेची शक्यता आहे. दुसरीकडे मविआने एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, जागा वाटप अंतिम झालेले नाही. मविआतील मित्रपक्षांची जागा वाटपासाठी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु होती. एकूणच युती आणि आघाडीतील जागा वाटपावर शिक्कामोर्तब होऊन सोमवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे २९ डिसेंबर रोजी सोमवारी युती, आघाडीची घोषणा होऊन आपापल्या उमेदवारांचे अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची भूमिका काय ?
महायुतीत समाधानकारक जागा मिळत नसल्याने माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चव्हाण आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे यांच्यात सोमवारी जालना येथे बैठक पार पडली. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष मविआत समाविष्ट होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ? की इतर निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
१६ प्रभागांत ६५ जागा
जालना महानगर पालिकेच्या १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. जागा वाटपांवरील युती, आघाडीतील तिढा पाहता अनेक प्रभागांत तिरंगी किंवा चौरंगी लढती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
४८ जणांनी भरले महानगर पालिकेसाठी अर्ज
जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी आजवर २४८७उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. पैकी केवळ ४८ जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. सोमवारी आणि मंगळवारी बहुतांश सर्वच उमेदवारांचे अर्ज दाखल होणार आहेत. त्यामुळे महायुती, मविआतील नेतेमंडळींचा निर्णयही लवकर होणे अपेक्षित आहे.
महायुतीत पाच जागा मिळणे हे आमच्या पक्षाला मान्य नाही. जिल्हाध्यक्षांनीही बैठकीत तेच सांगितले आहे. त्यामुळे निवडणुकीचा आमचा निर्णय आम्ही सोमवारी जाहीर करू. शेख महेमूद, महानगर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी (अजित पवार)