मतदार कोणाला 'तिळगुळ' देणार अन् नेते कोणाचा 'पतंग' काटणार? खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:53 IST2026-01-12T14:53:06+5:302026-01-12T14:53:35+5:30
लोणीकर - दानवे - कुचे विरूद्ध खोतकर - उढाण; राठोड-काळेंचेही आव्हान!

मतदार कोणाला 'तिळगुळ' देणार अन् नेते कोणाचा 'पतंग' काटणार? खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला
सोमनाथ खताळ/जालना : जालना महानगरपालिकेच्या पहिल्या ऐतिहासिक निवडणुकीचा रणसंग्राम रंगात आला असून, यंदाची निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. मकर संक्रांतीच्या सणासुदीत होणाऱ्या या निवडणुकीत 'मतदार कोणाला तिळगुळ देणार आणि नेते कोणाचा पतंग काटणार?' याची चर्चा आता गल्लीबोळातील चहाच्या टपरीपासून नेत्यांच्या कार्यालयापर्यंत रंगू लागली आहे. या राजकीय पतंगोत्सवात कोणाची 'फिरकी' चालणार आणि कोणाचा 'मांजा' पक्का ठरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राज्यात महायुती सत्तेत असली तरी जालन्यात भाजप आणि शिंदेसेना हे मित्रपक्ष एकमेकांविरूद्ध दंड थोपटून उभे आहेत. महापालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी भाजपने आपल्या तीन आमदारांची ताकद लावली आहे. यात बबनराव लोणीकर (परतूर), संतोष दानवे (भोकरदन) आणि नारायण कुचे (बदनापूर) यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. दुसरीकडे, शिंदेसेनेकडून स्वतः अर्जुन खोतकर (जालना) आणि हिकमत उढाण (घनसावंगी) यांनी मैदानात शड्डू ठोकला आहे. काँग्रेसकडून विधान परिषद आमदार राजेश राठोड आणि खासदार डॉ. कल्याण काळे हे आपला जुना गड राखण्यासाठी धडपडत आहेत.
३३ हजार नव्या मतांचा प्रभाव
१६ प्रभाग आणि ६५ सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेत २ लाख ४५ हजार मतदार आहेत. २०१६च्या तुलनेत यंदा ३३ हजार मतदारांची वाढ झाली असून, ही नवी मते सत्तेचे पारडे फिरविण्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. शहरात वैयक्तिक पातळीवर खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल (भाजप) यांचे वर्चस्व असले, तरी पक्ष म्हणून विजयाचा गुलाल कोण उधळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिष्ठेची लढाई
शिंदेसेनेसाठी हा आपला बालेकिल्ला वाचविण्याचा प्रश्न आहे. कारण येथे सध्या अर्जुन खोतकर हे शिंदेसेनेचे विद्यमान आमदार आहेत, तर भाजपसाठी ‘सर्वांत मोठा पक्ष’ ठरून आपला महापौर बसवण्याची संधी आहे. महायुतीमधील हा अंतर्गत संघर्ष विरोधकांसाठी फायद्याचा ठरणार की आमदारांची फौज आपल्या पक्षाला तारणार, याचा निकाल १६ जानेवारीला स्पष्ट होईल.
भाजप, शिंदेसेना, काँग्रेसचे किती उमेदवार?
जिल्ह्यात भाजप, शिंदेसेना आणि काँग्रेसचे आमदार, खासदार आहेत. त्यामुळे या तीन पक्षांच्या नेत्यांवर महापालिका निवडणुकीचा अधिक दबाव असणार आहे. महापालिकेत भाजपचे ६३, शिंदेसेनेचे ६१, तर काँग्रेसचे ४३ उमेदवार आहेत. इतर पक्षांचे नेते असले तरी खासदार, आमदार, मंत्री नाहीत.
प्रमुख पक्षांचे उमेदवार
भाजप - ६३, काँग्रेस -४३,
राष्ट्रवादी (अजित पवार) - ४०,
राष्ट्रवादी (शरद पवार) - १३,
शिंदेसेना - ६१,
उद्धवसेना - १२,
वंचित बहुजन आघाडी -१७
मतदारसंघ - आमदार - पक्ष
जालना - अर्जुन खोतकर - शिंदेसेना घनसावंगी - हिकमत उढाण - शिंदेसेना भोकरदन - संतोष दानवे - भाजप
बदनापूर - नारायण कुचे - भाजप
परतूर - बबनराव लोणीकर - भाजप
विधान परिषद - राजेश राठोड - काँग्रेस