आरटीईअंतर्गत फक्त ७० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित; १२८ शाळांची शिक्षण विभागाकडे नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:54 IST2025-02-26T16:53:14+5:302025-02-26T16:54:38+5:30
१,००८ विद्यार्थ्यांची निवड : जिल्ह्यात आहेत १,०११ जागा आरक्षित

Only 70 students admitted under RTE; 128 schools registered with Education Department
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात १,०११ जागांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली असून, २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. मंगळवारपर्यंत केवळ ७० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे उर्वरित तीन दिवसात शिल्लक प्रवेश होणार का, असा प्रश्न आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यात १२८ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली होती. या शाळांमध्ये १,०११ जागा असून, १४ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली होती. २ फेब्रुवारीपर्यत ३ हजार ३०४ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते. १४ फेब्रुवारी रोजी पुणे येथून राज्यस्तरीय सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये एक हजार आठ विद्यार्थ्यांना निवडीचे संदेश पाठविण्यात आले आहेत. आता या विद्यार्थ्यांची संबंधित पंचायत समितीमध्ये कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे.
...या तालुक्यातील प्रवेश निश्चित
आतापर्यंत देवरी तालुक्यात १०, तर गोंदिया तालुक्यात ६० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित सहा तालुक्यांमध्ये कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. ती पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना पत्र देण्यात येईल. ते पत्र निवड झालेल्या शाळेत दिल्यावर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
कागदपत्राची झाली पडताळणी, प्रवेश सुरु
१५६ विद्यार्थ्यांचे मंगळवारपर्यंत कागदपत्र पडताळणी करून स्वीकारण्यात आले आहेत, तर ७० विद्यार्थ्यांचे कागदपत्र अपलोड करून प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. एकंदर प्रवेश प्रक्रियेची गती संथ दिसून येत असून, ९३८ जागांसाठी प्रवेश शिल्लक आहेत.
जागा वाढल्या तरीही उदासिनता
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात आरटीईच्या १०८ जागा वाढल्या आहेत. यामुळे नक्कीच पालकांना दिलासा मिळाला, यात शंका नाही. मात्र, असे असतानाही प्रवेश निश्चितीला घेऊन पालकांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. हेच कारण आहे की, आतापर्यंत फक्त ७० प्रवेश निश्चित झाले आहेत. केंद्रांवर कागदपत्र पडताळणी करून स्वीकारण्यात आले आहेत. त्यांचे फिडिंग झाल्यावर हा आकडा वाढेल, यात शंका नाही.
२८ फेब्रुवारी डेडलाईन
अर्जाद्वारे सोडत काढण्यात आली असून, यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आता २८ फेब्रुवारीपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. त्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्यस्तरावरून होईल. त्यानंतर मात्र, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशासाठी संधी देण्यात येणार आहे.
पंचायत समितीमध्ये कागदपत्रे पडताळणी
- जिल्ह्यातील आठही १ तालुक्यातील पंचायत समितीमध्ये कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
- अर्ज भरतांना जी कागदपत्रे सादर केली तीच कागदपत्रे दाखल करावी लागत आहेत. त्यामध्ये त्रुटी आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येत आहेत. दरम्यान, २८ फेब्रुवारीपर्यंत पडताळणी करण्याचे आव्हान आहे.
- २८ फेब्रुवारी २०२५ची मुदत 3 असली तरी तीन दिवसांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल का, असा प्रश्न पालकांना आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेला पारदर्शक आणि गती मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ७० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून तीन दिवसांत प्रवेशासाठी पालकांची धावपळ होणार आहे.