माजी मंत्री राजकुमार बडोले आता अजित पवारांच्या छावणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:58 IST2024-10-23T16:57:21+5:302024-10-23T16:58:36+5:30
Gondia : अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून उमेदवारीची शक्यता; जिल्ह्यातील राजकारणात आले मोठे वळण

Former minister Rajkumar Badole is now in Ajit Pawar's camp
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी (दि.२२) मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यांना अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी तीन जागा भारतीय जनता पक्षाला तर उरलेली अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. भाजपने तीन उमेदवार रविवारी (दि.२०) जाहीर केले तर अर्जुनी-मोरगावबाबत महायुतीत बराच खल झाला.
अखेर माजी मंत्री बडोले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरविण्याचे ठरले. याबाबत सोमवारी (दि.२१) रात्री महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होऊन बडोलेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले
७१८ मतांच्या विजयाचा संदर्भ
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अर्जुनी-मोरगावचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे आता अजित पवार गटात आहेत. गेल्या निवड- णुकीत त्यांनी राजकुमार बडोले यांचा ७१८ मतांनी पराभव केला होता. आता चंद्रिकापुरे यांचे तिकीट कापले जाऊन त्यांना बडोले यांचा प्रचार करावा लागू शकतो. अशात आता आमदार चंद्रिकापुरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.