लोकवर्गणीतून गोळा झालेल्या रकमेतून सुरू होणार गरिबांसाठी कान्व्हेंट शाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 16:46 IST2025-03-31T16:45:04+5:302025-03-31T16:46:09+5:30
गरीब फाउंडेशन युवा संघटना : समाजासमोर ठेवला आदर्श

Convent school for the poor to be started with the money collected from public collection
गोंदिया : होळी, धुळवडीला ढोल-ताशाच्या गजरात युवक डीजेच्या तालावर नाचून बोजारा मागणे, मग जमा झालेल्या पैशातून धमाल मस्ती अथवा इतर गोष्टी करतात; पण या परंपरेला फाटा देत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव सुरबन येथील गरीब फाउंडेशन युवा संघटनेने शिमगा उत्सवात लोकवर्गणीतून जमा झालेल्या पैशातून स्थानिक गोरगरिबांच्या मुलांसाठी पूर्व प्राथमिक ( कॉन्व्हेंट) शिक्षणाची सोय व्हावी यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. गरीब फाउंडेशन युवा संघटनेच्या या उपक्रमाने समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे.
बोंडगाव सुरबन येथे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत एक ते सात वर्ग आहेत. येथून शिक्षण पूर्ण केलेले माजी विद्यार्थी हे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या माजी विद्यार्थ्यांच्या कल्पनेने गरीब फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. हल्ली शैक्षणिक क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली असून, या युवा संघटनेच्या माध्यमातून गावातील शिक्षणाचा स्तर उंचवावा, सामान्यातल्या सामान्य माणसांच्याही लेकराला गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळेतीलच एका वर्गखोलीत पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी दुजोरा देत आर्थिक पाठबळ देण्याचे मान्य केले. शाळा व्यवस्थापन समितीनेही यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. येत्या सत्रात अगदी लोकवर्गणीतून येथे कान्व्हेंट सुरू होणार आहे. गरीब फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
तरुणांसमोर ठेवला आदर्श
शिमगोत्सवातून गावकऱ्यांनी गरीब फाउंडेशनला दिलेली जवळपास २५ हजार रुपयांची वर्गणी इतर गोष्टींवर खर्च न करता शैक्षणिक कामासाठी खर्च करण्याचा निश्चय केला. अलीकडे तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. होळी, धुळवडीला मौजमस्ती करण्याकडे तरुणांचा अधिक कल असतो; पण या परंपरेला फाटा देत बोंडगाव सुरबन येथील युवकांनी पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्याची केलेली धडपड आणि उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, इतरही गावांनी यातून प्रेरणा घ्यावी.