गोंदिया जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांची चिंता वाढली; पीएम किसानचे अनुदान संकटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:32 IST2025-07-17T19:30:51+5:302025-07-17T19:32:47+5:30
एक लाख ७९ हजार शेतकऱ्यांना फार्मर आयडी : फार्मर आयडी नोंदणीत गोंदिया तालुका आघाडीवर

Concerns of 40 thousand farmers in Gondia district increased; PM Kisan subsidy in crisis
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २ लाख २० हजार ९५ लाभार्थ्यांपैकी अजूनही ४० हजार ४३३हून अधिक शेतकऱ्यांनी आवश्यक 'फार्मर आयडी' तयार केलेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
केंद्र सरकारने १ फेब्रुवारी २०१९पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, तर राज्य शासनाने २०२३-२४ पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अमलात आणली आहे. यासाठी आता 'फार्मर आयडी' आवश्यक करण्यात आला आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात २ लाख २० हजार ९५ शेतकरी पात्र आहेत. १२ जुलैपर्यंत १ लाख ७९ हजार ४३३ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे. अजूनही ४० हजार ४३३ शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने फार्मर आयडीसाठी नोंदणी करावी लागणार आहे. अन्यथा अनुदानाच्या पुढील हप्त्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना करावी लागणार त्वरित नोंदणी
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जिल्ह्यात २ लाख २० हजार पात्र लाभार्थी आहेत. यापैकी १ लाख ७९ हजार ४३३ लाभार्थ्यांची फार्मर आयडीसाठी नोंदणी झाली आहे, तर अद्याप ४० हजार शेतकरी नोंदणीपासून दूर आहेत. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी या शेतकऱ्यांना फार्मर आयडीसाठी नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी नोंदणीची प्रक्रिया त्वरित करावी लागणार आहे.
फार्मर आयडीत गोंदिया तालुका आघाडीवर
- गोंदिया जिल्ह्यात फार्मर आयडी तयार करण्यात गोंदिया तालुक्यातील शेतकरी आघाडीवर आहेत.
- या तालुक्यातील एकूण ५१,६७१ पात्र शेतकऱ्यांपैकी ४५,३१४ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली आहे. काही शेतकऱ्यांचे अर्ज प्रक्रियेत आहेत.
"शासनाच्या योजना व उपक्रमांचा लाभघेण्यासाठी 'फार्मर आयडी'ला विशेष महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. तसेच यापुढे सर्व योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याची दखल घेत फार्मर आयडी तयार करून घ्यावी."
- प्रजीत नायर, जिल्हाधिकारी गोंदिया