गोंदियातील तब्बल २२ हजार शेतकऱ्यांची धान चुकाऱ्यांअभावी आर्थिक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:39 IST2025-08-16T19:38:38+5:302025-08-16T19:39:52+5:30

पाच महिन्यांपासून पायपीट : २५० कोटी रुपयांच्या निधीची गरज

As many as 22,000 farmers in Gondia are in financial distress due to lack of paddy dues. | गोंदियातील तब्बल २२ हजार शेतकऱ्यांची धान चुकाऱ्यांअभावी आर्थिक कोंडी

As many as 22,000 farmers in Gondia are in financial distress due to lack of paddy dues.

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या २२ हजार १०५ शेतकऱ्यांचे २५० कोटी १२ लाख रुपयांचे चुकारे गेल्या पाच महिन्यांपासून थकले आहेत. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून गरज पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना सावकार आणि नातेवाइकांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.


शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून हमीभावाने धान खरेदी करते. यंदा रब्बी हंगामात धान विक्रीसाठी जिल्ह्यातील ६० हजार २७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ४९७७२ शेतकऱ्यांनी २० लाख ७४ हजार क्विंटल धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केली. खरेदी केलेल्या एकूण धानाची किमत ४७७ कोटी ८७लाख रुपये आहे. तर आतापर्यंत १० हजार ५०६ शेतकऱ्यांना २०४ कोटी रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. तर २२ हजार १०५ शेतकऱ्यांचे २५० कोटी रुपयांचे चुकारे गेल्या पाच महिन्यांपासून निधीअभावी थकले आहेत. सध्या खरीप हंगाम सुरू असून सणासुदीचे दिवस आहेत. यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. अनेक शेतकऱ्यांनी गरज भागविण्यासाठी लवकर धानाची विक्री केली. पण, पाच महिन्यांचा कालावधी लोटून विक्री केलेल्या धानाचे हक्काचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. परिणामी गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांना सावकार आणि नातेवाइकांच्या दारात उभे राहावे लागत आहे. तर काही शेतकरी चुकाऱ्यांचे पैसे जमा झाले का हे तपासण्यासाठी बँकेच्या पायऱ्या झिजवित आहेत. 


शेतकऱ्यांना बसतोय व्याजाचा भुर्दंड
अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील रोवणी व इतर कामे करण्यासाठी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. धानाचे चुकारे खात्यावर जमा झाले की सावकाराचे देणी फेडू असे नियोजन शेतकऱ्यांनी केले होते. मात्र पाच महिन्यापासून चुकारे थकल्याने २२ हजारावर शेतकऱ्यांना व्याजाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Web Title: As many as 22,000 farmers in Gondia are in financial distress due to lack of paddy dues.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.