म.गो.पक्ष का फोडता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2024 08:30 AM2024-04-02T08:30:12+5:302024-04-02T08:31:45+5:30

ढवळीकर बंधूंना न विचारताच भाजपने बालाजी गावस यांना काल आपल्या बाजूने ओढले. 

why are you breaking maharashtrawadi gomantak party | म.गो.पक्ष का फोडता?

म.गो.पक्ष का फोडता?

भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत बलवान होतो तेव्हा तेव्हा तो मित्रपक्षांना हादरे देतो. हे महाराष्ट्रातही सिद्ध झाले आहे व अन्य राज्यांतही. काल म.गो.च्या एका प्रमुख सदस्याला भाजपने आपल्या पक्षात घेऊन मगोप नेतृत्वाला पहिला धक्का दिला. 

अर्थात, कालचा धक्का सौम्य असला तरी, मगो पक्षनेतृत्वाला त्यातून योग्य तो संदेश भाजपने पाठवला आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर गोव्यात मगो पक्षाचे काय होऊ शकते, त्याची ही झलक आहे असे राजकीय विश्लेषक मानतात. धारबांदोड्याचे सरपंच बालाजी गावस हे मगो पक्षाचे सक्रिय सदस्य होते. प्रमुख कार्यकर्ते होते. ते गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सावर्डे मतदारसंघात मगोपचे उमेदवार होते. मंत्री सुदिन ढवळीकर आणि मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी त्यांना गेल्या निवडणुकीवेळी बरेच प्रोत्साहन दिले होते. मात्र ढवळीकर बंधूंना न विचारताच भाजपने बालाजी गावस यांना काल आपल्या बाजूने ओढले. 

मगो पक्षाच्या नेतृत्वाला पूर्णपणे अंधारात ठेवून ही खेळी खेळण्यात आली आहे. यामुळे मगो पक्षाच्या केंद्रीय समितीला धक्का बसलाच, शिवाय मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकरही हादरले आहेत. भाजपने अशी खेळी का खेळली असावी, याचे उत्तर ते शोधत आहेत. भाजपचा आयात संस्कृतीवर प्रचंड विश्वास आहे. 

उमेदवारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना आयात करण्याचे धोरण देशभर सुरू आहे. गोव्याच्या भाजप केडरलाही आता या धोरणाची सवय झाली आहे. दक्षिण गोव्यात पल्लवी धेपे यांना तिकीट दिल्यापासून सगळी पालखी सदानंद तानावडे व मुख्यमंत्री सावंत यांनाच उचलावी लागत आहे. पल्लवी भाजपच्याच आहेत, कालपरवा आलेल्या नाहीत, असे लोकांना सांगताना भाजपचे नेते थकत नाहीत. बाबू कवळेकर, दामू नाईक, नरेंद्र सावईकर वगैरे पालखीमागील वारकऱ्यांच्या यात्रेत मुकाट्याने सहभागी झाले आहेत. दक्षिण गोव्यातील हिंदू बहुजन समाज सध्या निवडणुकीचे विविध अर्थ लावत आहे. म.गो. भाजपसोबत सत्तेत आहे. भाजपचा मित्रपक्ष असल्याने मगोपच्या नेतृत्वाला वाटले होते की- आपला पूर्वीचा उमेदवार यावेळी भाजप पळवणार नाही. मात्र तो समज काल खोटा ठरला, गावस यांनी गुडबाय केल्यानंतर मगोला आता बाकीचे प्रमुख सदस्य किंवा गेल्यावेळचे उमेदवार सांभाळून ठेवावे लागतील.

काँग्रेस किंवा आरजी किंवा अन्य विरोधी पक्षांमधील जर कुणाला भाजपने फोडले असते तर मगोपला चिंतेचे कारण नव्हते. मात्र बालाजींनाच भाजपने गळाला लावल्यानंतर मगोपची चिंता वाढली. वास्तविक मगोच्या समर्थकांची मते लोकसभा निवडणुकीवेळी भाजपलाच मिळणार आहेत. कारण सुदिन ढवळीकर यांनी मगो यावेळी दक्षिणेत ४५ हजार मते भाजपला देईल असे म्हटले होते. ढवळीकर यांनी गेल्याच आठवड्यात असे विधान केल्यानंतर भाजपने दोन पावले आणखी पुढे टाकली व आतापासूनच मगोपच्या सदस्यांना आपल्या काखोटीला मारण्याचे काम सुरू केले. मगो पक्षाचे आमदार जीत आरोलकर हेही मनाने पक्षासोबत नाहीत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना याची कल्पना आहेच. कदाचित लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जीत आरोलकर यांनाही भाजप आपल्या पक्षात तर घेणार नाही ना?

गेल्यावेळी बाबू आजगावकर व दीपक प्रभू पाऊसकर यांना भाजपने फोडले होते. माजी मंत्री दीपक पाऊसकर यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्याचा प्रस्ताव आहेच. दीपक पाऊसकर अपक्षच असल्याने ते भाजपमध्ये गेले तरी, त्यात मगोपचे नुकसान नाही. मात्र दीपकपूर्वीच बालाजी यांना भाजपने पावन करून घेतले. सावर्डे, कुडचडे किंवा फोंडा तालुक्यात अन्य जे कुणी मगोपचे खंदे सदस्य आहेत, त्यांनादेखील गळाला लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. डिचोलीचे नरेश सावळ यांनी अलीकडेच मगो पक्ष सोडला. भाजपला तूर्त सावळ नकोत, कारण डिचोलीत आमदार चंद्रकांत शेट्ये यांना डिस्टर्ब न करण्याचा भाजपचा विचार असावा, फोंड्याचे केतन भाटीकर यांनादेखील यापुढील काळात भाजपकडून पक्ष प्रवेशाची ऑफर दिली जाऊ शकते.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोव्यात आणि देशातही अनेक छोट्या पक्षांच्या अस्तित्वाची कसोटी लागणार आहे, मगो पक्ष शिल्लक राहील की नाही, हे काळच ठरवील.
 

Web Title: why are you breaking maharashtrawadi gomantak party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.