कोण जिंकणार 'मैदान'? दक्षिण गोवा मतदारसंघात रंगतदार लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2024 09:30 AM2024-05-07T09:30:59+5:302024-05-07T09:32:28+5:30

काँग्रेसची मदार स्थानिक नेते, कार्यकर्त्यांवर; गोमंतकीयांना मतदानासाठी आवाहन

who will win south goa constituency for lok sabha election 2024 | कोण जिंकणार 'मैदान'? दक्षिण गोवा मतदारसंघात रंगतदार लढत

कोण जिंकणार 'मैदान'? दक्षिण गोवा मतदारसंघात रंगतदार लढत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: लोकसभेच्या दोन्ही आगांवर कोण जिंकणार याची मोठी उत्कंठा तमाम गोमंतकीयांना लागून राहिली आहे. उत्तर गोव्यातील चित्र काहिसे स्पष्ट असले तर दक्षिण गोव्यात मात्र भाजप उमेदवार पल्लवी धेपे व इंडिया आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांच्यात तुल्यबळ लढत आहे. आज राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

या निवडणुकीत काँग्रेस प्रचाराच्या बाबतीत बराच पिछाडीवर होता. पक्षाचा पहिल्या फळीतील एकही नेता केंद्रातून प्रचारासाठी आला नाही. या उलट भाजपतर्फे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले. उत्तर गोव्यात काँग्रेसच्या तशा मोठ्या सभाही झाल्या नाहीत. होर्डिंग किंवा इतर बाबतीतही प्रचारात कमी दिसली. केंद्रातून शशी थरूर वगैरे दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतील एक दोन नेते वगळल्यास कोणीही आले नाहीत. आमदार, गटाध्यक्ष तसेच सामान्य कार्यकाऱ्यांनीच प्रचाराची जबाबदारी पार पाडली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत श्रीपाद नाईक यांना २ लाख ४४ हजार ८४४ मते (५७.१२ टक्के) मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना १ लाख ६४ हजार ५९७ (३८.४० टक्के) मते मिळाली होती. आपचे तत्कालीन उमेदवार प्रदीप पाडगावकर यांना ४ हजार ७५६ (१९१टक्के) मते मिळाली होते. आप आता इंडिया आधाडीत आहे. त्यामुळे आपची मते काँग्रेस उमेदवाराकडे वळतात का? हे पहावे लागेल, वळली तरी मतांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे श्रीपाद यांचा विजय यावेळी १ लाखापेक्षा अधिक मताधिक्क्याने होईल, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते लीड मिळाली तरी ती यापेक्षा बरीच कमी असणार आहे.

दरम्या, दक्षिण गोव्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रफ्रान्सिस सार्दिन निवडून आले होते. त्यांना २ लाख १ हजार ५६१ (४७.४७ टक्के) मते मिळाली होती, त्यावेळी आपचे तत्कालिन उमेदवार एल्विस गोम्स यांना २० हजार ८९१ (४.९१ टक्के) मते प्राप्त झाली होती. यावेळी इंडिया आघाडीत काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी एकत्र आहेत. आपची मते काँग्रेस उमेदवाराकडे वळल्यास अटीतटीची लबत होऊ शकते.

मतदारांना मिळणार लिंबू पाणी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाहत आहे. मागील एक दोन दिवसांत पारा १ ते २ अंशांनी घसरला होता. त्यामुळे थोडा दिलासाहीं मिळाला असलातरी गोमंतकीयांची लाहीलाही होताना दिसत आहे. कड़क उन्हामुळे मतदानावर परिणाम पडू शकतो. लोक बाहेर पडण्यास टाळाटाळ करतील व त्यामुळे मतदान कमी होईल याचा विचार करून मतदान केंद्रावर आयोगाकडून मतदारांसाठी लिंबू पाणी, ज्युस आदी शीतपेयांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

 

Web Title: who will win south goa constituency for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.