काणकोणमध्ये पक्ष कार्यकर्त्यांत मानापमान; नाराजांना पक्ष नेतृत्वाकडून बोलावण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2024 09:31 IST2024-04-18T09:30:34+5:302024-04-18T09:31:59+5:30
असंतुष्टांशी कोणीच संपर्क साधलेला नाही.

काणकोणमध्ये पक्ष कार्यकर्त्यांत मानापमान; नाराजांना पक्ष नेतृत्वाकडून बोलावण्याची प्रतीक्षा
संजय कोमरपंत, लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण: काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी भाजपचे दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपो यांना किती मतांची आघाडी काणकोणात मिळेल ते जाहीर केले. तर काणकोण नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी त्यात भर घातली.
काणकोण तालुक्यात एकूण ३४,३५८ मतदार असून पालिका क्षेत्रात १०,२९३ मतदार आहेत तर ५९ बूथ आहेत. भाजप निवडणूक जवळ आली की कामाला लागण्याऐवजी आपल्या कार्यकर्त्याना ३६५ दिवस कामाला लावतो. त्यामुळेच पक्षाला, पक्षाच्या आमदारांना, पक्षाच्या वरिष्ठांना मतदारसंघातील चित्र दिसणे स्वाभाविक आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी सत्तेची फळे चाकली त्या दोन भाजप माजी आमदार विजय पै खोत व माजी मंत्री इजिदोर फर्नांडिस यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार रमेश तवडकर यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. ज्यामुळे भाजपाची १०८०३ मते फोडली गेली. त्यामुळेच तवडकरांना ९०६३ मते मिळाली. फक्त ३० टक्के मतावरच समाधान मानावे लागले होते.
पंचायतीच्या व नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान होत असते, असे चित्र विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीत दिसत नाही. विधानसभा निवडणुकीपेक्षा लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारीही थोडी कमीच असते. सध्या दक्षिण गोव्यात आरजीपीचे रुबर्ट परेरा, काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस, तर भाजपाच्या पल्लवी धेपो हे उमेदवार रिंगणात आहेत. रुबर्ट परेरा यानीही काणकोणात येऊन काही ठिकाणी मतदाराना मिळण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसच्या फर्नाडिस यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी व उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ७ वेळा काणकोणच्या विविध भागात दौरा केलेला आहे. मात्र, प्रचारकार्यांत भाजपाचा हात ते अजुन पर्यंत धरु शकलेले नाहीत.
भाजपचे ५९ ही बूथवर बूथ यंत्रणा, शक्तिप्रमुख असून आता नव्याने भाजपाने पन्ना प्रमुखाचीही निवड केली आहे. एका पन्ना प्रमुखाने मतदारयादीच्या एका पानावरील ३० मतदारांवरच लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यातील अधिकाधीक २० तरी मते भाजपाला मिळावीत अशा प्रकारे काम करण्याची पद्धती वरिष्ठानी कार्यकर्त्यांना शिकवितानाच जबाबदारी वाटुन दिलेली आहे. परंतु, ही जबाबदारी पन्ना प्रमुख यशस्वी करून दाखविण्यास काही अडचणी आहेत.
काणकोण भाजपात असंतुष्ट देखील आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसमध्येही असंतुष्ट आहेत. या असंतुष्टांशी कोणीच संपर्क साधलेला नाही वा विश्वासात घेतलेले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जनार्दन भंडारी यांनीकाँग्रेसकडून निवडणुक लढवित असतानाच मुळ काँग्रेसचे असलेले महादेव देसाई यांनी तृणमूल कॉग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढविली होती. जे भाजपात घडले होते तेच कॉग्रेस पक्षात घडले होते. त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. तर भाजपाच्या माजी आमदारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्याने भाजपालाही त्याचा फटका बसला होता.
विजय पै खोत व इजिदोर फर्नांडिस यांनी आपले पत्ते अजून खोललेले नाहीत. पालिका क्षेत्रात १२ नगरसेवकांपैकी ४ नगरसेवक सत्ताधारी मंडळापासून दूर असून सुप्रिया शेखर देसाई यानी गेल्या पालिका निवडणुकीत ३५२ मते घेऊन जयश्री किशोर शेट (३२७) याचा पराभव केला होता. तर पांडुरंग नाईक गावकर यानी किशोर शेट यांच्या विरुद्ध निवडणूक लढवून ४८८ मते घेतली होती. तर किशोर शेट यांना १३२ मते मिळाली होती. शुभम कोमरपंत याने ५२१ मते घेतली होती तर मारुती कोमरपंत यांना २७९ मते मिळाली होती. नीतू समीर देसाई यांना ५०९ मते तर सनिजा देसाई यांना ४५४ मते मिळाली होती. या चारही विरोधी नगरसेवकांची आपल्या प्रभागात घट्ट पकड असून त्याना मिळालेली मते १८७० होतात. १०२९३ मते असलेल्या पालिका क्षेत्रात या चार नगरसेवकाना बाजुला सारून चालणार नाही. हेही तितकेच खरे आहे.
विरियातो फर्नांडिस तसेच विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी भंडारी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, तो अजुन यशस्वी झालेला दिसत नाही. तर इजिदोर फर्नांडिस यांची साथ धरलेले भाजपाचे माजी मंडळ अध्यक्ष नंदीप भगत व त्याचे इतर साथीदार यांच्याकडे भाजपाने स्थानिक नेतृत्वाला वाईट वाटेल म्हणून कानाडोळा केला आहे. दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते आणि एस.टी. नेते तथा खोतीगावचे माजी सरपंच दया गावकर यांच्याकडेही नेतृत्वाने पाठ फिरविली आहे.