विजय वडेट्टीवार मंत्री होते, तेव्हाच भाजपप्रवेशावर झाली होती चर्चा, धर्मरावबाबा दाव्यावर ठाम

By संजय तिपाले | Published: April 18, 2024 01:45 PM2024-04-18T13:45:49+5:302024-04-18T13:46:38+5:30

vijay wadettiwar & Dharmaraobaba Atram: लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबला, पण मंत्री धर्मरावबाबा आत्राम व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात आरोप- प्रत्यारोपांची धग कायम आहे. वडेट्टीवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या दाव्याचा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी  १८ एप्रिलला अहेरी येथे पत्रकार परिषद घेऊन  पुनरुच्चार केला.

When Vijay Vadettiwar was a minister, there was a discussion on joining the BJP, Dharmarao Baba stood by the claim | विजय वडेट्टीवार मंत्री होते, तेव्हाच भाजपप्रवेशावर झाली होती चर्चा, धर्मरावबाबा दाव्यावर ठाम

विजय वडेट्टीवार मंत्री होते, तेव्हाच भाजपप्रवेशावर झाली होती चर्चा, धर्मरावबाबा दाव्यावर ठाम

- संजय तिपाले
गडचिरोली - लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबला, पण मंत्री धर्मरावबाबा आत्राम व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात आरोप- प्रत्यारोपांची धग कायम आहे. वडेट्टीवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या दाव्याचा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी  १८ एप्रिलला अहेरी येथे पत्रकार परिषद घेऊन  पुनरुच्चार केला. वडेट्टीवार मंत्री होते तेव्हाच त्यांना भाजप प्रवेशाची घाई होती, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसमोर मुंबईत विमानतळावर याबाबत चर्चा झाली होती, असा दावा धर्मरावबाबा आत्राम यांनी केला.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजप- काँग्रेस आमने- सामने आहे. या निवडणुकीत मंत्री धर्मरावबाबा आत्राम व विरोधी पक्षनपेते विजय वडेट्टीवार यांच्यात प्रचारादरम्यान कलगीतुरा रंगला होता. मंत्री धर्मरावबाबा यांनी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार हे ४ जूननंतर भाजपमध्ये प्रवेश करतील, असा खळबळजनक दावा केला होता. त्यावर वडेट्टीवार यांनी खुलासा करत हा दावा तथ्यहिन असल्याचे सांगून धर्मरावबाबांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी केली होती. १४ एप्रिल रेाजी धानोरा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत धर्मरावबाबा आत्राम यांनी १८ एप्रिलला ब्रेकींग देतो, असा इशारा दिला होता. त्यानुसार, १८ रोजी अहेरी येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वडेट्टीवार हे मंत्री होते तेव्हा मी आमदार होताे. मुंबईत विमानतळावर टर्मीनल १ वर भेट झाली. यावेळी आम्ही रिझव्हर्ड लॉनमध्ये गेलो. तेथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही होते. यावेळी वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली. यावेळी वडेट्टीवारांनी धर्मरावबाबांचे काय, असे विचारले. त्यावर बावनकुळे यांनी त्यांच्याबद्दल काही नाही, असे सांगितले होते.. असा चर्चेचा तपशील होता, असे धर्मरावबाबांनी सांगितले. या बैठकीला आमच्या तिघांचेही स्वीय सहायक होते. ही बाब शंभर टक्के खरी असून नार्को टेस्ट करायची तर माझी व विरोधी पक्षनेत्याचीही करा... असे आव्हान त्यांनी दिले.

माझ्या भानगडीत पडू नका - विजय वडेट्टीवार
धर्मरावबाबांच्या आरोपांना विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिले. धर्मरावबाबा खूप काही गौप्यस्फोट करतील असे वाटले, पण त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. विमानतळावर पक्षप्रवेशाच्या बैठका होतात का, असा प्रतिसवाल करुन वडेट्टीवार यांनी धर्मरावबाबांचा दावा  खोडून काढला. माझ्याशी पंगा घेतलाय तर जशास तसे उत्तर मिळेल. माझ्या भानगडीत पडू नका, नाही तर मी वैयक्तिक खुलासे करेन आणि त्यानंतर त्यांना मतदारसंघात फिरणे कठीण होईल, असा इशारा त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिला.

नेमका वाद काय ?
मंत्री धर्मरावबाबा आत्राम व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप- प्रत्यारोप निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. धर्मरावबाबा हे केवळ पैशाने श्रीमंत आहेत, पण बुध्दीने नाही, असे सांगताना वडेट्टीवार यांची जीभ घसरली होती. एकेरी उल्लेख करत डिवचल्याने हा वार धर्मराबाबांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर धर्मरावबाबांनीही आपल्या शैलीत वडेेट्टीवार यांचा खरपूस समाचार घेत खोचक टीका केली होती. याच दरम्यान धर्मरावबाबांनी ४ जूननंतर वडेट्टीवार हे भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा केला होता. त्यामुळे दोघांतील वाक् युध्द शिगेला पोहोचले आहे.

Web Title: When Vijay Vadettiwar was a minister, there was a discussion on joining the BJP, Dharmarao Baba stood by the claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.