कार्यक र्त्यांचे ‘मंडळ भारी आहे’
By Admin | Updated: September 13, 2015 04:46 IST2015-09-13T04:46:55+5:302015-09-13T04:46:55+5:30
रिअॅलिटी शो, मग ते गाण्याचे असोत वा नृत्याचे; त्यामुळे सहभागी कलाकारांना मिळणारी प्रसिद्धी आणि पसंती, प्रसिद्धीमुळे सहभागी कलाकारांच्या आयुष्याला मिळणारी

कार्यक र्त्यांचे ‘मंडळ भारी आहे’
रिअॅलिटी शो, मग ते गाण्याचे असोत वा नृत्याचे; त्यामुळे सहभागी कलाकारांना मिळणारी प्रसिद्धी आणि पसंती, प्रसिद्धीमुळे सहभागी कलाकारांच्या आयुष्याला मिळणारी कलाटणी हे सगळे घडतच असते. पण, या शोमुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने त्यांच्यातील टॅलेंटला वाव मिळू शकत नाही. त्यांना एक हक्काचे व्यासपीठ तर मिळतेच; पण त्याचबरोबर त्यांच्यातील जिद्द, मेहनत घ्यायची तयारी अनेकांना नवीन आदर्श देणारी असते. असाच एक शो सध्या स्टार प्रवाह या चॅनेलवर सुरू होण्यापूर्वीच प्रचंड चर्चेत आला आहे तो म्हणजे ‘मंडळ भारी आहे’. या शोमध्ये महाराष्ट्रातील विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांमधील एकजूट बघायला मिळणार आहे. त्यानिमित्त हा शो होस्ट करीत असलेले अभिनेता अमोल कोल्हे यांनी ‘सीएनएक्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना कार्यक र्त्यांमध्ये गवसलेल्या ‘रिअल हिरों’चे अनुभव शेअर केले.
अवघ्या काही दिवसांवर सर्वांचाच लाडका गणेशोत्सव येऊन ठेपलेला असतानाच मंडळांमधील एकी दाखवून देणारा ‘मंडळ भारी आहे’ हा शो येऊ घातला आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल अमोल कोल्हे सांगतात, ‘‘एकीकडे चौकाचौकांत मंडळांची वाढणारी संख्या आणि त्यामुळे परिसरातील इतर नागरिकांना होणारा त्रास, कार्यक र्त्यांची अरेरावी, देणग्या देण्यासाठी केली जाणारी दमदाटी ही नाण्याची एक बाजू बहुतेक करून सर्वांनीच अनुभवलेली असते. पण, दुसरी बाजू ही बहुधा केवळ कार्यकर्त्यांच्या घरच्यांना आणि इतर कार्यकर्त्यांनाच ठाऊक असते. पण, या शोमुळे कार्यकर्त्यांमध्येच खरा हीरो दडलेला असतो, हे कोणी जाणून घेत नाही. कार्यकर्त्यांची दमदाटी, उद्धटपणा हे सगळे खरे असले, तरी ५ टक्के लोकांमुळे इतर ९५ टक्के, जे खरोखरीच सत्कार्य करीत असतात अशा लोकांचेही नाव खराब होते आणि परिणामी हे खरे हीरो कधीच पुढे येऊ शकत नाहीत.’’
‘कार्यकर्ता’ एक ऊर्जास्रोत
मंडळ आणि कार्यकर्त्यांकडे आपण नेहमी एका टिपीकल चष्म्यातून बघतो. पण, त्यांची एक सामाजिक बांधिलकी, त्यांच्याकडून राबविले जाणारे सामाजिक उपक्रम यांकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. या कार्यकर्त्यांमध्ये कामाप्रति एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळते. पण, या घटकाकडे नेहमीच दुर्लक्ष होते. माझ्या मते, ‘कार्यकर्ता’ हा खरोखरीच एक ऊर्जास्रोत आहे. बहुसंख्येने समाजकार्य करणाऱ्या या सच्च्या कार्यकर्त्यांचा उर्वरित ५ टक्के कार्यकर्त्यांनी आदर्श घेतला आणि त्यांच्यातील ही ऊर्जा एखाद्या विधायक कार्यासाठी लाभली, तर हा घटक नक्कीच समाजात एक चांगले स्थान तयार करू शकतो.
तरुणांसाठी एक हक्काचे व्यासपीठ
हा कार्यक्रम कार्यकर्त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणार आहे. स्वत:ची मतं परखड आणि बिनदिक्कत त्यांना या ठिकाणी मांडता येतील. यामध्ये अगदी चौकाचौकांत मंडळं असावीत की नाही इथपासून कार्यक र्त्यांची त्यामागे काय भूमिका असते, इथपर्यंत स्वत:ची मतं मांडण्याची संधी त्यांना इथं मिळेल.