'पंचायत सीझन ५' कधी येणार? रिंकीनेच केला खुलासा; सचिवजींसोबत लग्नही होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:37 IST2025-07-04T15:35:58+5:302025-07-04T15:37:11+5:30
'पंचायत'च्या रिंकीने सगळंच सांगितलं, कधी येऊ शकतो सीझन ५?

'पंचायत सीझन ५' कधी येणार? रिंकीनेच केला खुलासा; सचिवजींसोबत लग्नही होणार?
'पंचायत' या गाजलेल्या वेबसीरिजचा चौथा सीझन काही दिवसांपूर्वीच आला. हा सीझनही चाहत्यांनी डोक्यावर उचलून घेतला. साधी हलकी फुलकी कहाणी, निरागस अशी गावाची कहाणी हे या सीरिजचं वैशिष्ट्य आहे जे अजूनही तसंच आहे. चौथ्या सीझननेही प्रेक्षकांना खूप हसवलं आणि भावुकही केलं. आता नेहमीप्रमाणेच चाहत्यांना पुढच्या सीझनची उत्सुकता आहे. त्यासाठी किती वाट बघावी लागणार याचं उत्तर 'पंचायत'च्या रिंकीनेच दिलं आहे.
'पंचायत'सीरिजमधले सर्वच कलाकार आज स्टार झालेत. सचिवजी, रिंकी, प्रल्हाद चा, विकास, बनराकस, विनोद लोकप्रिय झाले. नुकतंच रिंकी म्हणजेच अभिनेत्री सानविकाला एका मुलाखतीत सीझन ५ बद्दल विचारण्यात आलं. 'फीवर एफएम'ला दिलेल्या मुलाखतीत सानविका म्हणाली, "पाचवा सीझन १०० टक्के येणार आहे. सध्या सीझनच्या लेखनाचं काम सुरु आहे. हा सीझन कधी येईल हे तर आम्हालाही माहित नाही. पुढील वर्षापर्यंत यायला पाहिजे अशी आशा आहे."
रिंकी आणि सचिवजींचं लग्न होणार का? यावर सानविका म्हणाली,"मला स्वत:लाच माहित नाही. जोपर्यंत स्क्रिप्ट येत नाही तोवर मलाही कळणार नाही. माझी तर इच्छा आहे की आता बस झालं, आता लग्न करुनच द्या यार. खूप हळूहळू गोष्ट पुढे सरकली पण आता मलाही वाटतंय की तो झोन खूप झाला. आता लग्न होऊ दे. तसं जर झालं तर भूमिका साकारताना नवीन चॅलेंज असेल. लग्नात काय अडचणी येतात, अमुक होतं तमूक होतं असं सगळं दाखवता येईल. फक्त आता लग्न करुन टाका."
'पंचायत'मध्ये रिंकी आणि सचिवजींची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूपच आवडली. चौथ्या सीझनमध्ये दोघांमध्ये जवळीकही दाखवली. मात्र दोघांमध्ये आता विधायक ची मुलगी चित्रा येणार का असाही प्रेक्षकांनी अंदाज लावला. पाचव्या सीझनची सर्वांना आतापासूनच उत्सुकता आहे.