डोळ्यांत वाच माझ्या...
By Admin | Updated: January 26, 2017 06:57 IST2017-01-26T06:57:26+5:302017-01-26T06:57:26+5:30
बॉलिवूडमधील प्रत्येकाला लोकांच्या मनात भरण्यासाठी चांगल्या भूमिकांची अपेक्षा असते. देखणेपण, उत्तम भूमिका, संवाद, संगीत हा सारे हिट चित्रपटासाठी यशस्वी फॉर्म्युला आहे.

डोळ्यांत वाच माझ्या...
बॉलिवूडमधील प्रत्येकाला लोकांच्या मनात भरण्यासाठी चांगल्या भूमिकांची अपेक्षा असते. देखणेपण, उत्तम भूमिका, संवाद, संगीत हा सारे हिट चित्रपटासाठी यशस्वी फॉर्म्युला आहे. यासाठी कलाकार कोणतेही परिश्रम घेण्यास तयार असतात. काही भूमिका आडवाटेच्या असतात. त्याकडे जाण्यास अनेकांचा नकार असतो. अशा भूमिका साकारून चित्रपट हिट करणारेही अनेक जण आहेत. अंधांच्या भूमिका करून चित्रपट हिट होईल किंवा नाही यावर ‘ब्लार्इंड गेम’ खेळणाऱ्या आणि डाव यशस्वीपणे जिंकणाऱ्या कलाकारांची कमी नाही. बॉलिवूडचा चार्मिंग स्टार हृतिक रोशन आगामी ‘काबिल’ या चित्रपटात एका चॅलेंजिंग भूमिकेत दिसणार आहे. ‘काबिल’मध्ये हृतिक एका अंध व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. यासाठी त्याने देखील चांगलीच मेहनत घेतली आहे. हृतिकसोबतच यामी गौतमदेखील या चित्रपटात अंध मुलीची भूमिका साकारणार आहे. अशा वेळी हृतिक रोशन व यामी गौतमकडून सर्वोत्कृष्ट अभिनयाची अपेक्षा ठेवावी लागेल. अंधांच्या भूमिका साकारणाऱ्या बॉलिवूड कलाकारांविषयी...
राणी मुखर्जी : संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटात राणी मुखर्जी हिने मिशेल या अंध व बधिर मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चनदेखील अंधाच्या भूमिकेत होते. त्यानी मिशेलच्या शिक्षकाची भूमिका केली. जगापासून वेगळ्या पडलेल्या मिशेलला शब्दज्ञान करून देण्याचा प्रयत्न या चित्रपटाचा आत्मा आहे. या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला राष्ट्रीय पुरस्कारासह आंतराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले.
काजोल : यशराज बॅनरच्या कुणाल कोहली दिग्दर्शित ‘फना’ या चित्रपटात काजोलने मध्यांतरापूर्वी अंध काश्मिरी मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात मध्यांतरापर्यंत आमिर खान दिल्लीतील टुरिस्ट गाईड व त्यानंतर एका दहशतवाद्याच्या भूमिकेत असतो. अंध व्यक्तीच्या भूमिकेत काजोल एकदम फिट बसली होती. अंध मुलीची भूमिका साकारताना ती अॅक्टिंग करीत आहे, असे हा चित्रपट पाहताना कुठेच वाटत नाही.
अक्षय कुमार : विपुल शाह दिग्दर्शित ‘आँखे’ या चित्रपटात अक्षय कुमारसह अर्जुन रामपाल व परेश रावल यांनी अंध व्यक्तीच्या भूमिका साकारल्या होत्या. हे तिघेही अमिताभ बच्चन यांच्या सांगण्यावरून एका बँकेत दरोडा घालतात. यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते. या चित्रपटात अक्षयने साकारलेल्या भूमिकेला प्रचंड पसंती मिळाली होती. अक्षयकुमारने या चित्रपटासाठी चांगलीच मेहनत घेतली हे विशेष.
दीपिका पादुकोण : प्रदीप सरकार दिग्दर्शित ‘लफंगे परिंदे’ या चित्रपटात दीपिका पादुकोण हिने एका अंध मुलीची भूमिका केली होती. या चित्रपटात नील नितीन मुकेश याने केलेल्या अपघाताचे प्रायश्चित म्हणून अंध झालेल्या दीपिकाला तो डान्स शिकवितो. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला नसला तरीदेखील दीपिकाच्या भूमिकेची चांगलीच प्रशंसा झाली.
संजय दत्त : तनुजा चंद्रा दिग्दर्शित व काजोलची मुख्य भूमिका असलेल्या ‘दुश्मन’ या चित्रपटात संजय दत्तने एका अंध आर्मी आॅफिसरची भूमिका साकारली होती. संजय दत्त या चित्रपटात अंध असूनही दमदार अॅक्शन करताना दिसला. या चित्रपटासाठी काजोल व संजय दत्तच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती.
संजीव कुमार : कत्ल
आर. के. नय्यर दिग्दर्शित १९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘कत्ल’ या चित्रपटात बायकोचा खून करणाऱ्या अंध व्यक्तीची भूमिका संजीवकुमार याने साकारली होती. खुनाच्या आरोपात अडकलेल्या पत्नीचा प्रियक र निरपराध असून तिच्या अंध नवऱ्याने हत्या केली आहे हे पोलीस अधिकारी शत्रू (शत्रुघ्न सिन्हा) सिद्ध करून दाखवतो. या चित्रपटात संजीव कुमारने साकारलेली भूमिका वास्तव्याच्या अगदीच जवळची वाटणारी आहे. ‘कत्ल’मधील रहस्य प्रेक्षकांना बांधून ठेवणारे आहे. अंध व्यक्तींवर तयार करण्यात आलेल्या चित्रपटात कुठे ना कुठे ‘कत्ल’ची झलक पाहायला मिळते हे विशेष.