मानधनातील जेंडर बायसविरुद्ध हीरोइन्सचा लढा!
By Admin | Updated: July 31, 2015 03:46 IST2015-07-31T03:46:22+5:302015-07-31T03:46:22+5:30
चित्रपटाच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असूनही किंबहुना त्यांच्या नावावर चित्रपट चालत असूनही मानधनातील जेंडर बायसविरुद्ध आता हिरोईन्स लढा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

मानधनातील जेंडर बायसविरुद्ध हीरोइन्सचा लढा!
चित्रपटाच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असूनही किंबहुना त्यांच्या नावावर चित्रपट चालत असूनही मानधनातील जेंडर बायसविरुद्ध आता हिरोईन्स लढा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांनी मानधनावर ठाम राहण्याचेही ठरविले आहे.
चित्रपटसृष्टी मग ती ‘हॉलीवूड’, ‘बॉलीवूड’ किंवा मराठी, इतर क्षेत्राप्रमाणे चित्रपट विश्वावरदेखील ‘मेल डॉमिनेटेड’चा पगडा अधिक आहे. एखाद्या मसालाप्रधान चित्रपटाला खमंग फोडणी द्यायची झाली, की मग त्यात अभिनेत्रींना स्थान दिले जाते. मात्र, अनेक चित्रपट हे नायिकाप्रधानही असतात. पण तरीही अभिनेत्रींना दुय्यम लेखले जाते. समान वागणूक तर सोडाच पण मानधनाच्या बाबतीतही अभिनेत्रींना तडजोड करावी लागते. याविरुद्ध हॉलिवूडच्या सेलिब्रिटी पँट्रिका अकर््वेटी आणि मेरिल स्ट्रिप या अभिनेत्रींनी नुकताच आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. त्या पंक्तीत आता मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हे नावदेखील जोडले गेले आहे. चित्रपटांमध्ये मानधनाच्या बाबतीत अभिनेता-अभिनेत्रींमध्ये भेदभाव केला जातो, असे जाहीर मतप्रदर्शन तिने केले आहे. याबाबत मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींशी ‘सीएनक्स’ने संपर्क साधला असता, यामध्ये तथ्य असल्याचे सांगण्यात आले आहे. चित्रपटांत आमचेही महत्त्व आहे आणि भूमिकेच्या प्रमाणात मानधन मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मुळातच मराठी इंडस्ट्रीमध्ये कलाकारांना मानधन कमी आहे. पण हे खरं आहे, की अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना कमी मानधन दिल जातं. पण हे डिमांड आणि सप्लायवरही तितकच अवलंबून आहे. त्यातही आपल्याकडे अभिनेत्यांवर आधारित चित्रपटांच प्रमाण अधिक आहे. पण ही आपली परंपरा आहे. त्यामुळे त्यामध्ये बदल करायचा म्हणजे नक्की काय करायचं, हा एक प्रश्नच आहे.
- नीलेश नवलाखा, निर्माता
मला निर्मात्यांकडून अभिनेत्यांपेक्षा कमी मानधन मिळाले आहे, असे अद्यापपर्यंत कधी झालेले नाही. कारण, मी स्वत: जेवढा वेळ दिलाय त्याप्रमाणेच मानधन घेते. निर्मात्यांकडून अनेकदा सांगितल जातं, की आम्ही दोघांनाही एकसारखेच मानधन देतो पण हे खोटं आहे. हे निश्चितच थांबलं पाहिजे.
- सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री
चित्रपटांसाठी मिळणारे मानधन अनेक गोष्टींवर अवलंबून असते. माझ्या चित्रपटातील अभिनेत्याला किती पैसे मिळतात, यापेक्षा मी माझे त्या सिनेमातील काम किती महत्त्वपूर्ण आहे, ते पाहून मानधन ठरविते. आपल्या सहकलाकाराला किती पैसे मिळतात, हे समजल्यावर अभिनेत्री पुढे येऊन बोलत नाहीत, अशी परिस्थिती सगळीकडेच आहे. मी माझ्या स्वत:साठी आवाज उठवते. माझी भूमिका आणि त्यासाठी मला काहीवेळेस घ्यावे लागणारे प्रशिक्षण, लुक चेंज या गोष्टींसाठी मी योग्य ते मानधन घेते.
- क्रांती रेडकर, अभिनेत्री
मानधन किती घ्यायच, हे प्रत्येक परिस्थितीवर अवलंबून असते आणि त्याबरोबरच कोणाशी कंपेअर करतोय यावरही ते ठरवलं जातं. पण माझ्या मते प्रत्येक कलाकाराने एखाद्या चित्रपट, मालिका अथवा नाटकासाठी किती वेळ दिला आहे किंवा त्यामध्ये काय भूमिका साकारली आहे, या सगळ्यांच गणित मांडून प्रत्येकाने आपले मानधन घेतले पाहिजे आणि त्यावर ठाम राहिले पाहिजे. कारण, कोणताही निर्माता कोणाला किती मानधन दिले, हे कधीच सांगत नाही.
- प्रिया बापट, अभिनेत्री