Udaipur Files : विजय राजच्या नव्या सिनेमामुळे देशात खळबळ, कन्हैय्यालाल हत्या प्रकरणावर आधारीत कहाणी, जाणून घ्या
By देवेंद्र जाधव | Updated: July 9, 2025 16:23 IST2025-07-09T16:19:08+5:302025-07-09T16:23:15+5:30
Udaipur Files Kanhaiya Lal Tailor Murder : विजय राजच्या नव्या सिनेमामुळे देशात वाद निर्माण झाला असून सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. सिनेमा भारतात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे

Udaipur Files : विजय राजच्या नव्या सिनेमामुळे देशात खळबळ, कन्हैय्यालाल हत्या प्रकरणावर आधारीत कहाणी, जाणून घ्या
Udaipur Files Kanhaiya Lal Tailor Murder : सध्या मनोरंजन विश्वात एका चित्रपटामुळे वादंग निर्माण झालाय. हा चित्रपट म्हणजे ‘उदयपूर फाईल्स’. विजय राजची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा भारतात घडलेल्या एका सत्य घचनेवर आधारीत आहे. या घटनेने देशाच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात बरीच खळबळ माजली होती. ‘उदयपूर फाईल्स’ सिनेमा याच सत्य घटनेवर आधारीत आहे. जाणून घ्या या सिनेमाबद्दल
काय होतं प्रकरण?
२८ जून २०२२ रोजी राजस्थानमधील उदयपूर शहरात, ४८ वर्षीय कन्हैयालाल या टेलर काम करणाऱ्या व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. दोन मुस्लिम आरोपींनी कन्हैय्यालालची तलवारीने निर्घृण हत्या केली. हे संपूर्ण कृत्य आरोपींनी व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोडही केलं, ज्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली.
झालं असं की, सोशल मीडियावर नूपुर शर्मा (त्या काळी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्या) यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टला समर्थन देणारी पोस्ट कन्हैय्यालाल यांनी शेअर केली. यावरून काही लोकांनी त्यांच्यावर तक्रार केली होती. त्यामुळे काही काळ कन्हैय्यालाल पोलिसांच्या ताब्यातही होते.
पोलीस समजुतीनं प्रकरण मिटल्याचं मानलं जात असतानाच, रियाज अख्तारी आणि गौस मोहम्मद या दोघांनी कथितपणे कट रचून कन्हैय्यालाल यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर "इस्लामच्या अपमानाचा बदला घेतला" असा आरोपींनी दावा केला.
कधी रिलीज होणार सिनेमा?
याच हत्या प्रकरणावर आधारित ‘उदयपूर फाईल्स’ हा सिनेमा आता ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. सुप्रीम कोर्टाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यास नकार देत, तो नियोजित वेळेनुसार प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता विजय राजने कन्हैयालाल यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन भरत श्रीनाथे यांनी केले असून तो राजलक्ष्मी क्रिएशन्स आणि ओमजी फिल्म्स यांच्या संयुक्त बॅनरखाली तयार झाला आहे. विशेष म्हणजे CBFC ने सिनेमावर १५० कट्स सुचवले आहेत.