ताऱ्यांचे आजाराशी दोन हात
By Admin | Updated: November 9, 2015 03:01 IST2015-11-09T03:01:16+5:302015-11-09T03:01:16+5:30
बॉलीवूड नावाच्या चंदेरी दुनियेतल्या चमचमत्या सिताऱ्यांकडे पाहिले की असे वाटते, ‘यार लाइफ असावं तर अस्संच...काय पण यांचे नशीब आहे...ना कसली चिंता... ना कसलं टेन्शन.. पडद्यावरचं आणि पडद्याबाहेरच

ताऱ्यांचे आजाराशी दोन हात
बॉलीवूड नावाच्या चंदेरी दुनियेतल्या चमचमत्या सिताऱ्यांकडे पाहिले की असे वाटते, ‘यार लाइफ असावं तर अस्संच...काय पण यांचे नशीब आहे...ना कसली चिंता... ना कसलं टेन्शन.. पडद्यावरचं आणि पडद्याबाहेरच त्यांचं झगमगीत आयुष्य पाहून आपल्यासारख्या सामान्यांना त्यांचा हेवा वाटणं साहजिक आहे, पण खरंच असं असतं का? की त्यांना मिळणाऱ्या ग्लॅमरसारखीच त्यांची दुखणीही घवघवीत, ठसठशीत असतात? हो, शेवटी तेही माणसंच आहेत आणि त्यांनाही शारीरिक त्रासांना सामोरे जावेच लागते. यातील अनेक ताऱ्यांनी आयुष्यात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांना मोठ्या हिमतीने तोंडही दिले आहे. चला तर मग वाचूया, त्यांच्या धाडसाची कहाणी.
हृतिक रोशन
आज चित्रपटातले संवाद फाडफाड बोलणाऱ्या हृतिकला त्याच्या लहानपणी एक वाक्यच काय, पण एक साधा शब्दही न अडखळता बोलता येत नव्हता. तो तोतरे बोलण्याच्या समस्येने त्रस्त होता. ‘ह्याचे हिरो होण्याचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकणार नाही,’ असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ठासून सांगितले होते. त्यामुळे आपसूकच त्याचा आत्मविश्वास कमी झाला, परंतु तरीही हार न मानता मोठ्या जिद्दीने त्याने ‘स्पीच थेरपी’ घेतली. आजही त्याला न चुकता रोज एक तास ‘स्पीच थेरपी’चा सराव करावा लागतो. एवढेच नाही, तर तीव्र डोकेदुखीनेही त्याला वारंवार एमआरआय, सीटीस्कॅ नला सामोरे जावे लागत आहे.
सोनम कपूर
बॉलीवूडची ‘फॅशन आयकॉन’ म्हणून आज सोनमकडे पाहिले जाते. तिची फिगर, तिचा फिटनेस आणि स्वत:ला प्रेझेंट करण्याची तिची स्टाईल पाहून लाखो तरुणींना तिचा हेवा वाटतो, पण बहुतेकांना माहीतच नाही की, टीनएज पासूनच अनिल कपूरच्या या गोंडस कन्येला ‘डायबेटीज’सारख्या आयुष्यभर पाठ न सोडणाऱ्या आजाराने ग्रासले आहे. डाएट प्लॅनचे कटाक्षाने पालन करून तिने या आजारावर नियंत्रण मिळवले आहे. एकीकडे या आजाराशी झुंज देत, दुसरीकडे करिअरही सोनमने उत्कृ ष्ट पद्धतीने सांभाळले आहे.
सलमान खान
सलमान आणि समस्या असे जणू समीकरणच बनले आहे. चेता संस्थेशी निगडित ‘ट्रायजेमिनल न्युरालजिया’ या आजाराने सलमानला हैराण केले आहे. यामुळे जबडा आणि गाल यांना प्रचंड वेदना होतात. ब्रश करणे, चावणे, पिणे आणि चेहऱ्याला होणाऱ्या साध्या स्पर्शामुळेही मरणयातना सहन कराव्या लागतात. परदेशात जाऊन सलमानला त्याच्या या आजारावर नियमित उपचार घ्यावे लागतात. सलमान अशा भयंकर आजाराचा शिकार आहे, असे त्याच्याकडे पाहून आपल्याला चुकूनही वाटत नाही.
अभिषेक बच्चन
सुपरस्टार अमिताभ यांचा हा मुलगा लहानपणी ‘डायस्लेक्झिया’ या आजाराचा शिकार झाला होता. हा एक न्युरोलॉजिकल आजार असून, यामुळे रुग्णांना वाचन, लिहिण्यात आणि स्पेलिंग ओळखण्यात अडथळा येतो. यामुळे अभिषेकला त्याच्या शैक्षणिक जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. तरीही मोठ्या शिताफीने त्याने शिक्षण पूर्ण केले.
श्रुती हसन
कमल हसन याची कन्या आणि आजची आघाडीची नायिका श्रुतीचे डोळे खूप कमजोर आहेत. फक्त १० टक्केच तिची दृष्टी काम करू शकते. तिने स्वत:च ट्वीट केले की, चष्म्याशिवाय तिला २ सेमी अंतरापेक्षा जास्त पाहणे अवघड आहे. त्यामुळे व्यक्तींना ओळखण्यात चूक होणे, काचेच्या दरवाजावर धडक णे तिच्यासाठी नेहमीचेच आहे, तरीही ना ती स्वत:ला कमी लेखत, ना कुढत बसत. स्वत:च्या या कमजोरीचे तिला दु:ख वाटत असले, तरीही याबाबतच्या न्यूनगंडाला तिच्या मनात अजिबात थारा नाही.