टीआरपीचा खेळ सारा...

By Admin | Updated: June 19, 2016 03:47 IST2016-06-19T03:47:11+5:302016-06-19T03:47:11+5:30

अभिनेता महेश ठाकूरने छोट्या पडद्यावर आतापर्यंत साकारलेल्या सगळ्याच भूमिका सकारात्मक आहेत. महेशने कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

TRP game sara ... | टीआरपीचा खेळ सारा...

टीआरपीचा खेळ सारा...

अभिनेता महेश ठाकूरने छोट्या पडद्यावर आतापर्यंत साकारलेल्या सगळ्याच भूमिका सकारात्मक आहेत. महेशने कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ‘सत्या’ या चित्रपटात महेशने पहिल्यांदा नकारात्मक भूमिका साकारली होती, पण आजही छोट्या पडद्यावर गुड बॉय म्हणूनच महेश ओळखला जातो, पण पहिल्यांदाच महेश ‘इश्कबाज’ या मालिकेद्वारे त्याची इमेज बदलत आहे. त्याच्या या नव्या भूमिकेविषयी ‘सीएनएक्स’सोबत त्याने मारलेल्या गप्पा...

प्रश्न : तू नेहमीच अतिशय चांगल्या मुलाची, भावाची, पतीची भूमिका साकारली आहेस. पहिल्यांदाच तू खलनायकाची भूमिका साकारणार आहेस. खलनायक साकारण्याचा निर्णय तू कसा घेतलास?
मी या मालिकेत तेज सिंग ओबेरॉय ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तेजने अतिशय मेहनत करून खूप पैसा कमवला आहे. त्यामुळे या गोष्टीचा त्याला प्रचंड गर्व आहे. तेज हा खलनायक आहे, असे मी म्हणणार नाही. प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या परिस्थितीनुसार वागत असते. तेजलासुद्धा परिस्थितीने वाईट वागण्यास भाग पाडले आहे, असे मला वाटते. एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारणे गरजेचे असल्याने मी ही भूमिका स्वीकारली. मी ‘सत्या २’ या चित्रपटात साकारलेला खलनायक प्रेक्षकांना आवडला होता. त्यामुळे या मालिकेतील व्यक्तिरेखाही प्रेक्षकांना आवडेल, याची मला खात्री आहे.

प्रश्न : या मालिकेत तुझा लूकही खूप वेगळा आहे. या मागचे कारण काय?
मी आतापर्यंत सगळ्याच चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये क्लीन शेव्हमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळालेलो आहे. मी नकारात्मक भूमिका साकारत असल्याने माझा लूकही थोडा वेगळा असावा, असे प्रोडक्शन टीमचे म्हणणे होते. त्यामुळे मी दाढी वाढवायला सुरुवात केली आणि त्यानंतरचा माझा लूक टीमला खूप आवडला. त्यामुळे हाच लूक आम्ही फायनल केला.

प्रश्न : तू गेली १७ वर्षे टीव्हीवर काम करत आहेस. या इतक्या वर्षांत छोट्या पडद्यावर काय बदल झाले आहेत, असे तुला वाटते?
छोट्या पडद्यावरच्या मालिका या आता टीआरपीवर अधिक लक्ष केंद्रित करायला लागल्या आहेत. मालिकेची कथा ही कितीही चांगली असली, तरी प्रेक्षकांच्या आवडीप्रमाणे त्याच्यात काही बदल केले जातात. पूर्वी टीआरपी हा खेळ खूपच कमी होता, पण आता ही परिस्थिती बदललेली आहे. आज छोटा पडदा हा सगळ्यांच्या आयुष्याच्या एक अविभाज्य भाग बनला आहे. मी तर या छोट्या पडद्यावर कसा आलो, हे खूप मजेशीर आहे. मी या क्षेत्रात अनपेक्षितपणेच आलो. मी मॉडेलिंग करत असताना रवी राय यांनी मला ‘सैलाब’ या मालिकेविषयी विचारले. मी मॉडेलिंग करून चांगले पैसे कमवत असल्याने मॉडलिंग सोडून दुसरे काहीही करायचे नाही, असेच मी ठरवले होते, पण माझी प्रेयसी, जी आज माझी पत्नी आहे, तिला ‘सैलाब’ ही मालिका प्रचंड आवडत होती. तिनेच मला या मालिकेत काम करण्यास तयार केले आणि तिथून माझ्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला. त्या काळात मालिका या आठवड्यातून एकदा असल्याने आजसारखी धावपळही नसायची. त्यामुळे मी मालिका करायला सुरुवात केली.

प्रश्न : या मालिकेत तू एका कुटुंबप्रमुखाची भूमिका साकारत आहेस, कुटुंब हे प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्त्वाचे असते, असे तुला वाटते?
कुटुंबाशिवाय माणूस जगूच शकत नाही, असे मला वाटते. कुटुंब म्हणजे केवळ आपले आई, वडील, भाऊ, बहीण, मुले एवढेच मर्यादित नसते. तुमचे मित्रमैत्रिणीही तुमच्या कुटुंबाचा एक भाग असतात. मालिकेचे, चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना ती टीमही माझे कुटुंबच असते, असे मी समजतो.

- prajakta.chitnis@lokmat.com

Web Title: TRP game sara ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.