बाहुबलीच्या यशाला मराठी तरुणाचा स्पर्श
By Admin | Updated: September 14, 2015 03:23 IST2015-09-14T03:23:46+5:302015-09-14T03:23:46+5:30
बॉलीवूडमधील आतापर्यंतचे जवळपास सर्वच रेकॉडर््स मोडीत काढणाऱ्या आणि जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ‘बाहुबली’ चित्रपटाच्या यशाला मराठी तरुणांचा स्पर्श लागला आहे

बाहुबलीच्या यशाला मराठी तरुणाचा स्पर्श
बॉलीवूडमधील आतापर्यंतचे जवळपास सर्वच रेकॉडर््स मोडीत काढणाऱ्या आणि जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ‘बाहुबली’ चित्रपटाच्या यशाला मराठी तरुणांचा स्पर्श लागला आहे. चित्रपटात माहिष्मती राजघराण्याचं वैभव, भव्यदिव्य राजवाडा आणि प्राण्यांची एकाहून एक अशी सरस शिल्पे पाहताना डोळे दिपून जातात. यातील प्राण्यांची अप्रतिम शिल्पे बनविण्यात या तरुणाचा हातभार लागला आहे. आशिष एकनाथ देवरे असे या शिल्पकाराचे नाव आहे.
शंकराची मूर्ती साकारली
कामाच्या शोधात आशिषने मुंबईतील गणेश गल्ली गणेशोत्सव मंडळाकडे विचारणा केली. त्यांनी शंकराची मूर्ती बनविण्याची संधी त्याला दिली. मात्र हे काम केवळ सेवातत्त्वावर करावे लागणार होते. या कामाचा कुठलाही मोबदला आशिषला दिला जाणार नव्हता, तशी अटच घातली गेली. आशिषने शंकराची मूर्ती बनविण्याचे आव्हान स्वीकारले. पंधरा दिवसांतच त्याने १४ फुटांची शंकराची भव्यदिव्य मूर्ती साकारली. तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची वाहवादेखील मिळविली. येथून आशिषला एकापाठोपाठ एक संधी मिळत गेल्या. खोपोली येथील इमॅजिका पार्क येथील आबालवृद्धांच्या पसंतीस उतरलेली ‘कार्टून्स’ व ‘प्रिन्स आॅफ डार्क वॉटर’ ही शिल्पे आशिषने तयार केली. त्याच्या शिल्पातील जिवंतपणा आणि कामामध्ये स्वत:ला पूर्णत: झोकून देण्याची मान्यता पाहता आशिषला नोएडा (उत्तर प्रदेश) येथील ‘मॉल आॅफ इंडिया’मध्येही शिल्प तयार करण्याची संधी मिळाली. तेथील ‘स्की इंडिया’ कंपनीच्या बर्फाच्छादित दालनातील रोबोचे शिल्प त्याने तयार केले.
आशिषच्या शिल्पकलेची दखल पुढे बाहुबलीच्या निर्मात्यांनी घेतली. हैदराबाद येथे ‘बाहुबली’ चित्रपटातील प्राणी व तत्सम शिल्पे तयार करण्याचा त्याला प्रस्ताव दिला. बाहुबलीच्या भव्यदिव्य सेटवरील मूर्ती साकारणे मोठे कसोटीचे काम होते. मात्र आशिषने ते लीलया पार पाडले. चित्रपटासाठी हत्ती, ३५ फूट उंचीचे घोडे त्याने अतिशय सफाईदारपणे तयार केले. शूटिंग आणि शिल्प बनविण्याचे काम सारखेच सुरू असल्याने रात्रंदिवस त्यांना शिल्पे तयार करावी लागत. आर्ट डायरेक्टरच्या मागणीनुसार तातडीने शिल्पे तयार करून देणे कसोटीचे काम असल्याचे आशिष सांगतो. या कामासाठी आशिषला महिन्याकाठी दीड ते दोन लाख रुपये मानधन दिले गेले.
धुळे व्हाया दिल्ली
धुळे जिल्ह्यातील गोंदूर या लहानशा गावचा असलेल्या आशिषला कलेचा वारसा वडिलांकडूनच मिळाला आहे. १९७०च्या दशकात आशिषचे वडील एकनाथ देवरे यांनी दिल्ली गाठली आणि त्यांच्यातील शिल्पकलेला वाव दिला. पुढे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, आशिषने ‘स्कल्प्चर डिप्लोमा’ करत शिल्कलेतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीमध्ये त्याने काही शिल्पे बनविलीदेखील. मात्र, हवे तसे यश मिळत नसल्याने त्याने २०११ मध्ये मुंबई या मायानगरीत स्थैर्य मिळविण्याचा प्रयत्न केला. कामाच्या शोधात त्याने अनेक फिल्म स्टुडिओचे उंबरठेही झिजविले; पण संधी मिळत नव्हती. मात्र, अपयशाने खचून न जाता, त्याने आपली शोध मोहीम कायम ठेवली. अखेर महाबलीची त्याला संधी मिळाली.