यंदाही असतील नायिकाच ‘हिरो’!
By Admin | Updated: January 11, 2017 05:48 IST2017-01-11T05:48:53+5:302017-01-11T05:48:53+5:30
अलीकडे बॉलिवूडच्या नायिका नायकांना अक्षरश: धूळ चारताना दिसत आहेत. गेल्या दोन वर्षांत बॉक्स आॅफिसवर नायिकाप्रधान चित्रपटांची चलती आहे.

यंदाही असतील नायिकाच ‘हिरो’!
- Rupali Mudholkar -
अलीकडे बॉलिवूडच्या नायिका नायकांना अक्षरश: धूळ चारताना दिसत आहेत. गेल्या दोन वर्षांत बॉक्स आॅफिसवर नायिकाप्रधान चित्रपटांची चलती आहे. पूर्णत: नायिकांभोवती फिरणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनीही या चित्रपटांना चांगला प्रतिसाद दिला आहे. गतवर्षी सोनाक्षी सिन्हाचा ‘अकिरा’, विद्या बालनचा ‘कहानी 2’, सोनम कपूरचा ‘नीरजा’, तापसी पन्नूचा ‘पिंक’, राधिका आपटेचा ‘फोबिया’, फातिमा सना शेख हिचा अलीकडेच आलेला ‘दंगल’ असे अनेक नायिकाप्रधान चित्रपट आलेत आणि प्रचंड गाजलेत. २०१७मध्येही असेच नायिकाप्रधान चित्रपट पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच, नायिकाच या चित्रपटांच्या खऱ्या ‘हिरो’ असतील. तेव्हा एक नजर टाकूया या चित्रपटांवर...
बेगम जान
‘डर्टी पिक्चर’, ‘कहानी’, ‘कहानी 2’ या चित्रपटांत केवळ आणि केवळ विद्या बालन हीच पडद्यावर दिसली. या तिन्ही चित्रपटांत विद्याच ‘हिरो’ होती. विद्याच ‘हिरो’ असलेला आणखी एक चित्रपट मार्चमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. होय, ‘बेगम जान’ हा पूर्णत: नायिकाप्रधान सिनेमा फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारलेला आहे. हा या वर्षांतला सर्वांत पहिला नायिकाप्रधान चित्रपट असेल.
फिल्लोरी
अनुष्का शर्मा व दिलजित दोसांज यांची मुख्य भूमिका असलेला ‘फिल्लोरी’ हा सिनेमाही येत्या मार्चमध्येच प्रदर्शित होत आहे. अनुष्का शर्मा हिची निर्मिती असलेला हा चित्रपट रोमॅन्टिक कॉमेडी प्रकारात मोडणारा असला, तरी नायिकाप्रधान चित्रपट आहे.
नूर
सोनाक्षी सिन्हा हिने ‘अकिरा’ अगदी एकटीच्या बळावर पेलला, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. या चित्रपटातील सोनाचा अॅक्शन अवतार पाहून सगळेच थक्क झाले. ‘अकिरा’नंतर सोनाक्षी लवकरच ‘नूर’ या नायिकाप्रधान चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट पाकिस्तानी लेखक सबा इम्तियाज यांच्या ‘कराची’ या नॉवेलवर आधारित आहे. यात सोना पाकिस्तानी पत्रकार व लेखिका नूर हिची व्यक्तिरेखा साकारणार आहे. येत्या एप्रिलमध्ये सोना आणि केवळ सोनाभोवती फिरणारा ‘नूर’ पाहायला तुम्हीही उत्सुक असालच!
हसीना
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर बेतलेला ‘हसीना’ हा नायिकाप्रधान चित्रपटही या नव्या वर्षांत आपल्या भेटीस येणार आहे. श्रद्धा कपूर यात हसीना पारकर हिची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे श्रद्धा हीच या चित्रपटाची खरी ‘हिरो’ असेल.
नाम शबाना
‘पिंक’फेम अभिनेत्री तापसी पन्नू हिचा ‘नाम शबाना’ हा सिनेमा येत्या मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. २०१५मध्ये आलेल्या ‘बेबी’ या सिनेमाचा हा सिक्वल आहे. हा चित्रपटही नायिकाप्रधान चित्रपटांच्या रांगेत मोडणारा चित्रपट आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक दाखवणारे पोस्टर पाहिल्यानंतर तुम्हीही हे मानाल.
पद्मावती
‘पद्मावती’ हा यंदाचा सगळ्यांत बहुप्रतीक्षित चित्रपट. भन्साळी यांचा हा सिनेमा खिल्जी वंशाच्या अलाउद्दीन खिल्जी यांच्यावर आणि मेवाडची राणी पद्मावती यांच्यातल्या प्रेमावर आधारलेला आहे. राणी पद्मावतीही तिची सुंदरता, बुद्धी आणि साहसासाठी ओळखली जायची. दीपिका पादुकोण या राणी पद्मावतीची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे तिच या चित्रपटाची खरी ‘हिरो’ असणार आहे.
सिमरन
बॉलिवूड ‘क्वीन’ कंगना राणावत पुन्हा एकदा ‘सिमरन’ या चित्रपटात शीर्षक भूमिकेत दिसणार आहे. सिमरन साकारणारी कंगना हीच या चित्रपटात भाव खाऊन जाणार, हे वेगळे सांगणे नकोच. येत्या सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होतोय.