‘३१ आॅक्टोबर’ चित्रपटात थरार

By Admin | Updated: October 22, 2016 03:25 IST2016-10-22T03:25:45+5:302016-10-22T03:25:45+5:30

चित्रपट म्हणून ३१ आॅक्टोबरमध्ये काही विशेष लक्षवेधी नसले तरीही या चित्रपटाची राजकीय आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहाता याची नोंद घेणे गरजेचे आहे. ३१ आॅक्टोबर, १९८४ या दिवशी

Thrill in '31 October 'movie | ‘३१ आॅक्टोबर’ चित्रपटात थरार

‘३१ आॅक्टोबर’ चित्रपटात थरार

- जान्हवी सामंत

चित्रपट म्हणून ३१ आॅक्टोबरमध्ये काही विशेष लक्षवेधी नसले तरीही या चित्रपटाची राजकीय आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहाता याची नोंद घेणे गरजेचे आहे. ३१ आॅक्टोबर, १९८४ या दिवशी घडलेल्या सत्य परिस्थितीची संवेदनशील मांडणी ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात जी हिंसा पसरली होती, त्याचा दिल्लीतील एका सामान्य कुटुंबावर काय परिणाम झाला हे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते.
३१ आॅक्टोबर या चित्रपटात देविंदर सिंगच्या (वीर दास) आयुष्यात केवळ २४ तासांत काय गोष्टी घडतात हे दाखविण्यात आले आहे. ईलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये काम करणाऱ्या देविंदरचा दिवस नेहमीप्रमाणेच सुरू होतो. गुरुद्वारामध्ये प्रार्थना केल्यानंतर दोन मुलांच्या शाळेची तयारी करून तो रोजच्यासारखा कामाला जातो. आॅफिसमधील अनेक जण क्रिकेटची कॉमेंट्री ऐकण्यात व्यग्र असतात. त्याची पत्नी तेजिंदर (सोहा अली खान) घरातील सगळी कामे संपवून लहान मुलीला सांभाळत असते. पण दुपारनंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची बातमी येते. त्यांची हत्या ही त्यांच्याच शीख बॉडीगार्डने केली आहे ही बातमी संध्याकाळपर्यंत सगळीकडेच पसरते आणि लोक शिखांच्या जिवावर उठतात. राजकीय नेतेदेखील या गोष्टीचा फायदा घेऊन लोकांच्या भावना अधिक भडकवतात आणि यामुळे सगळीकडे दंगली उसळतात. हजारो निष्पाप शीख लोकांची हत्या केली जाते.
लोकांना चाकू, काठ्या घेऊन फिरताना, सगळीकडे जाळपोळ करताना देविंदर आणि तेजिंदर पाहात असतात. अनेक शीख लोकांची हत्या केली जात असते.हा सगळा प्रकार पाहून ते दोघेही प्रचंड घाबरतात. या सगळ्या परिस्थितीत पोलीसदेखील काहीच करत नसतात. त्यामुळे आपला जीव धोक्यात असल्याचे देविंदरच्या कुटुंबीयांच्या लक्षात येते आणि ते आपले घर सोडून, आपल्या परिसरातून पळून जाण्याचे ठरवतात. देविंदरचे मित्र पाल (दीप्राज राणा), टिळक (विनीत शर्मा) आणि योगेश (लाखा लखविंदर सिंग) त्यांना मदत करायला हजर होतात. दंगल उसळलेली असताना कोणालाही ते शीख आहेत हे न समजू देता देविंदरचे कुटुंब कसा पळ काढते हे या चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे.
एक चित्रपट म्हणून ३१ आॅक्टोबर ही ऐतिहासिक कथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात पूर्णपणे अपयशी ठरतो. त्याचे पहिले कारण म्हणजे सोहा अली खान आणि वीर दास दोघेही आपल्या व्यक्तिरेखेत कम्फर्टेबल नाहीत. आपल्या घरात अथवा आपल्या मुलांसोबत खेळताना या दोघांच्या अभिनयात सहजता जाणवत नाही. सोहा तर लहान बाळासोबत खूपच अवघडल्यासारखी वाटते. लहान घरात लोक कसे वावरतात याची सोहा आणि वीर या दोघांनाही कल्पना नसल्याचे चित्रपट पाहताना वाटते आणि त्यामुळेच चित्रपटाच्या पूर्वार्धात त्यांच्या घरातील वातावरण, त्यांचे कामकाज हे दाखविण्यात चित्रपट अपयशी ठरतो. कलाकारांना जर पूर्वार्धासाठी आपण दोषी ठरवत असू, तर मध्यांतरानंतरच्या चित्रपटासाठी दिग्दर्शकाला दोषी ठरविणे गरजेचे आहे.
तरीही मध्यांतरानंतर चित्रपटात काही चांगल्या गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत. रस्त्यावर सोहाने पाहिलेली दंगलीची दृश्ये अथवा चित्रपटात क्लायमॅक्सला उलगडलेले काही रहस्यमय क्षण या चित्रपटातील काही चांगल्या गोष्टी आहेत. पण चित्रपटात असे क्षण काही निवडकच आहेत. चित्रपटात अतिशय हिंसक आणि भीतीदायक दृश्ये दाखविली गेली असली तरीही निर्मात्याला चित्रपटाच्या कथेवर तशी पकड बांधता आलेली नाही.

१९८४च्या दंगलीला अनेक वर्षे झाली आहेत. या काळात आजसारख्या
२४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या नव्हत्या. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांना का मारले गेले आणि त्यांच्या हत्येनंतर शीख लोकांवर काय अत्याचार झाले याची तितकीशी माहिती लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. या तुलनेत १९९२ला मुंबईत झालेली दंगल अथवा २००२ची गुजरातमधील दंगल प्रसारमाध्यमांमुळे लोकांना चांगलीच माहीत आहे. १९८४ ची दंगल झाल्यानंतरही काही दिवस तरी शीख लोकांवर अत्याचार होत होते एवढीच या दंगलीची आठवण आजच्या लोकांना आहे.
दंगलपीडित लोकांच्या आठवणी आणि ऐकीव माहिती यामधूनच ही दंगल किती भयानक होती हे आपल्याला कळते. आजही अनेक कुटुंबं त्या दिवशी घडलेल्या दंगलीच्या दहशतीखाली आहेत. आजपर्यंत लोकांनी ज्या दंगलीकडे दुर्लक्ष केले होते, त्या दंगलीवर हा चित्रपट प्रकाशझोत टाकतो. त्यामुळेच हा चित्रपट खूप महत्त्वाचा ठरतो.

Web Title: Thrill in '31 October 'movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.