गोष्ट तशी चांगली, पण मांडताना विस्कळीत....

By Admin | Updated: September 26, 2015 23:06 IST2015-09-26T23:05:13+5:302015-09-26T23:06:56+5:30

समाजात दहशत पसरवू पाहणाऱ्यांना कुणाच्याही सुख-दु:खाशी देणेघेणे नसते. भावना, संवेदना त्यांच्या मनाला शिवतही नाहीत. वाट्टेल ते करून लक्ष्य साधणे एवढेच त्यांना माहीत असते.

The thing is good, but it is disturbing. | गोष्ट तशी चांगली, पण मांडताना विस्कळीत....

गोष्ट तशी चांगली, पण मांडताना विस्कळीत....

समाजात दहशत पसरवू पाहणाऱ्यांना कुणाच्याही सुख-दु:खाशी देणेघेणे नसते. भावना, संवेदना त्यांच्या मनाला शिवतही नाहीत. वाट्टेल ते करून लक्ष्य साधणे एवढेच त्यांना माहीत असते. अशा वेळी ते कोणत्याही साधनांचा वापर करून त्यांचे इप्सित गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात आणि तो सहजसाध्य होण्याकरिता सर्वसामान्यांचा वीक पॉइंट हेरतात. ‘वक्रतुंड महाकाय’ चित्रपट अशा विषयावर बोलत उत्कंठावर्धक गोष्ट मांडतो. मुळात ही गोष्ट तशी चांगली आहे, पण सांगताना मात्र ती विस्कळीत झाली आहे.
या चित्रपटाची कथा अगदी साधी आहे. एक माणूस हातात गणपतीची मूर्ती घेऊन एका मंदिरात जातो. गणपतीची ही मूर्ती म्हणजे वास्तविक गणपती बाप्पाची कापडाची प्रतिकृती असते आणि तिच्यात बॉम्ब लपवला असल्याचे सूचित करत, बॉम्बस्फोट घडवण्याचा त्या व्यक्तीचा हेतू चित्रपटात स्पष्ट होत जातो. त्या गणपती बाप्पाला मंदिरात ठेवून ती व्यक्ती तेथून नाहीशी होते. तेथे खेळणाऱ्या एका ८-१० वर्षांच्या मुलाच्या नजरेत हा बाप्पा पडतो, त्याला तो खूप आवडतो आणि तो त्या गणपतीला घेऊन तेथून बाहेर पडतो. येथून सुरू होतो या गोष्टीतला खरा थरार ! पुढे या बाप्पाचा, या ना त्या कारणाने अनेक व्यक्तींच्या हातातून प्रवास होत राहतो. योगेश जोशी याची कथा व पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन पुनर्वसु नाईक याने केले आहे. ही गोष्ट म्हणजे एक प्रकारचा खेळ आहे आणि शेवटपर्यंत तो उत्कंठा ताणून धरतो. मात्र या खेळात काही पात्रे अनाहूतपणे एन्ट्री घेतात आणि हा खेळ अधूनमधून विस्कटतो. परिणामी, यातला थरार हवा तितका थरारक ठरत नाही. गणपतीने दूध पिणे वगैरे अशा वास्तवात घडून गेलेल्या घटनेचा यात केलेला वापर चांगला असला, तरी चित्रपटाच्या गोष्टीला मात्र तो मारक ठरतो. काही प्रसंगांची चित्रपटातल्या गोष्टीशी संबंध नसताना केलेली पेरणीही अनावश्यक वाटते. चित्रपटाचा सगळा फोकस जिच्यावर आहे, ती गणपती बाप्पाची प्रतिकृती मात्र लक्ष वेधून घेणारी आहे. या चित्रपटात छोट्या मुलाच्या भूमिकेत नमन जैन याने चांगली कामगिरी केली आहे. उषा नाडकर्णी यांनी मोजक्या प्रसंगांमध्येही खास त्यांच्या स्टाईलने रंग भरले आहेत. विजय मौर्य, नचिकेत पूर्णपात्रे, शशांक शेंडे, ऋषी देशपांडे आदी कलाकारांसह काही प्रसंगांत दिसणारे जयंत सावरकर, प्रार्थना बेहेरे यांचे काम ठीक आहे.

Web Title: The thing is good, but it is disturbing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.