त्या आल्या, त्यांनी पाहिले आणि जिंकले
By Admin | Updated: September 24, 2015 00:51 IST2015-09-24T00:51:32+5:302015-09-24T00:51:32+5:30
बॉलीवूडमधल्या ‘त्या’ सुपरस्टार्स आहेत़ सुरुवातीला त्यांच्याबरोबर काम करताना विशेष भीती किंवा फारसे टेन्शन आले नव्हते. मात्र जेव्हा त्यांच्या ‘परिणिता,’

त्या आल्या, त्यांनी पाहिले आणि जिंकले
बॉलीवूडमधल्या ‘त्या’ सुपरस्टार्स आहेत़ सुरुवातीला त्यांच्याबरोबर काम करताना विशेष भीती किंवा फारसे टेन्शन आले नव्हते. मात्र जेव्हा त्यांच्या ‘परिणिता,’ ‘पा,’ ‘अधुरी एक कहानी’ अशा काहीशा सुपरडुपर हिट चित्रपटांची यादी पाहिली आणि मग एक क्षण मनात भीतीचा गोळा आला. तरीही त्या खूप मोठ्या अभिनेत्री आहेत, हे त्यांनी मला कधीच जाणवू दिले नाही हा त्यांचा मोठेपणा होता. ‘त्या आल्या, त्यांनी पाहिले आणि जिंकले,’ अशा शब्दांत अभिनेता मंगेश देसाई याने विद्या बालनवर स्तुतिसुमने उधळली.
‘भोली सूरत दिलके खोटे’ या गाण्याद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या भगवानदादांच्या जीवनावर निर्मित होत असलेल्या ‘अलबेला’ चित्रपटातून विद्या बालन मराठीत पदार्पण करीत आहे. यामध्ये ‘भगवानदादा’ साकारत असलेल्या मंगेश देसाईसारख्या प्रतिभावंत कलाकाराबरोबर ‘गीताबाली’च्या भूमिकेत तिचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे, तिच्याबरोबर काम करतानाचे अनुभव मंगेशने ‘सीएनएक्स’शी बोलताना शेअर केले. कलाकार मग कुठलाही असो, एकमेकांविषयी ते कधी फारसे कौतुकाचे बोल बोलतीलच याची शाश्वती नाही. पण मंगेशने ही समजूत काहीशी खोटी ठरवली आहे. विद्या बालनचे केवळ कौतुक करण्यापर्यंतच तो केवळ थांबला नाही, तर ती ‘अलबेला’मध्ये आल्यामुळे हा चित्रपट वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. एखादी मोठी नटी आल्यानंतर खरेतर बुजायला होते, मात्र अशी पहिलीच अभिनेत्री पाहायला मिळाली, की तिने सगळ्यांना आपलेसे केले. सुपरस्टार असली तरी मराठीमध्ये जाते
ना, मग कुठलाच तोरा ठेवायचा नाही, अशा अविर्भावात त्या आल्याने टीमशी छान रिलेट झाल्या. सुरुवातीला ‘गीताबाली’च्या भूमिकेसाठी कोणतीच अभिनेत्री मिळत नव्हती, पण मग मिळाली ती एकदम ‘सुपरस्टारच! दिग्दर्शक शेखर सरटंडेल यांनी त्यांना साइन केल्याचे जेव्हा सांगितले तेव्हा ते खोटं बोलत आहेत, असे आम्हाला वाटले. फोटोशूटचा दिवस ठरला. पण काही कारणास्तव तो दिवसही पुढे ढकलला़ मोठ्या स्टार्सचे असंच असतं, असं पटकन बोलून गेलो, पण फोटो शूट झाल्यानंतर जेव्हा गीताबालीच्या आविर्भावातील त्यांचा फोटो पाहिला तेव्हा हबकलो. हुबेहूब गीताबाली समोर असल्याचे भासत होते, अत्यंत उत्साहात मंगेश सांगत होता.
शूटिंगसाठी त्यांनी काही डेट्स दिल्या होत्या. त्यांच्याबरोबर दोन गाणी करायची होती़ नृत्याच्या स्टेप्स खूप सोप्या होत्या, मात्र करताना त्या तितक्याशा सोप्या नाहीत ते जाणवत होते़ पण त्या उत्तम डान्सर असल्याने खूप सहजपणे त्या स्टेप्स करीत होत्या, मलाच काहीसे दडपण आले होते. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी त्या आमच्यासाठी गिफ्ट्स घेऊन आल्या, सगळ्यांना खूपच छान वाटले. मलाही त्यांना काहीतरी द्यावेसे वाटले म्हणून आर्चिसमध्ये गेलो. गणेशोत्सवास सुरुवात होणार असल्यामुळे गणेशमूर्ती द्यावी, असे मनात आले़ पण माझे लक्ष बाळकृष्णाकडे गेले. गणपती जसे कलेचे तसाच बाळकृष्ण सुखसमृद्धीचे प्रतीक असतो. त्यामुळे त्यांना बाळकृष्ण भेट दिला. तर त्यांनी माझे आवडते प्रतीक असलेल्या सूर्याचे चिन्ह भेट देऊन मला चकितच केले. त्यांच्याबरोबर काम करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याची भावना त्याने व्यक्त केली.