'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील 'या' अभिनेत्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 20:08 IST2019-06-18T20:07:54+5:302019-06-18T20:08:21+5:30
२५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील 'या' अभिनेत्याला अटक
झी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत राणादाचे वडील म्हणजेच आबांची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद दास्ताने यांना पोलिसांनी अटक केली आहे. २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. मिलिंद दास्ताने यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केलं असता २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे अक्षय गाडगीळ यांनी अभिनेते मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीविरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती.
तक्रारीत त्यांनी मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीने आपल्या औंध येथील सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला होता.
ही रक्कम जवळपास २५ लाख रुपये इतकी आहे. आपण वारंवार मागणी करुनही बिलाची रक्कम दिली जात नसल्याचे अक्षय गाडगीळ यांनी तक्रारीत म्हटलं होतं. यानंतर पोलिसांनी कारवाई करत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
अखेर मंगळवारी चतुःश्रृंगी पोलिसांनी दास्ताने यांना अटक केली.