म्हणून निगेटिव्ह भूमिका भावतात – प्रिया मराठे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 17:07 IST2017-03-29T11:18:54+5:302017-03-29T17:07:07+5:30

छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध आणि ओळखीचा चेहरा म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे. विविध मालिका, नाटक आणि सिनेमांमधून प्रियाने आपले वेगळे ...

Therefore, it is a negative role - Priya Marathe | म्हणून निगेटिव्ह भूमिका भावतात – प्रिया मराठे

म्हणून निगेटिव्ह भूमिका भावतात – प्रिया मराठे

ong>छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध आणि ओळखीचा चेहरा म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे. विविध मालिका, नाटक आणि सिनेमांमधून प्रियाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पवित्र रिश्ता' मालिकेतील 'वर्षा' म्हणून घराघरात पोहचलेली प्रिया सध्या छोट्या पडद्यावरील 'साथ निभाना साथियाँ' या मालिकेत निगेटिव्ह शेड असलेली भूमिका साकारत आहे. याचनिमित्ताने  सीएनएक्स लोकमतने प्रियाशी दिलखुलास संवाद साधला.
 
सध्या तू 'साथ निभाना साथियाँ 'या मालिकेत काम करत आहेस, या मालिकेत तू आजवर कधीही न केलेल्या गोष्टी केल्या आहेस त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल ?
 

या मालिकेत मी निगेटिव्ह शेड असलेली भूमिका साकारत आहे. आजवर मी ब-याच निगेटिव्ह भूमिका साकारल्या आहेत. मात्र या भूमिकेला वेगळी शेड आहे. याआधी लेहंगा, भले मोठे दागदागिने, मोठी बिंदी, फुल ऑन गुजराती-राजस्थानी अशाप्रकारची भूमिका कधीही साकारली नव्हती. त्यामुळे या भूमिकेचा  ऑरा काही निराळाच आहे. गुजराती आणि राजस्थानी भाषेचा सरमिसळ करत ती बोलते. ही भूमिका साकारण्याआधी मी फक्त तिची कल्पना केली की ही व्यक्तीरेखा कशी असेल. कारण मी साकारत असलेली व्यक्ती फक्त हिंदीत बोलली तर काही मजा येणार नाही. त्यामुळे गुजराती-राजस्थानी भाषेचा एकत्रित वापर करुन बोलल्याने भूमिकेला वेगळं परिमाण लाभलं आहे असं मला वाटते. त्यामुळे ही मालिका साकारताना खूप मज्जा येते . या आधीही 'तू तिथे मी' या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारली असली तरी त्यात फार वेगळं करायला मिळालं नव्हतं. मात्र त्यानंतर ज्या मालिकांमध्ये विशेष करण्यासारखं काही असेल अशाच भूमिका साकारण्यावर मी भर दिला आणि आता मी त्याचा आनंद घेतेय.
 
मराठी असो किंवा हिंदी दोन्ही भाषेतील मालिकांमध्ये अभिनयाची छाप पाडण्यात तू यशस्वी ठरली आहेस.  मात्र दोन्ही इंडस्ट्रीत काम करताना तुला काय वेगळेपण जाणवलं ?
 
मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम करताना बराच फरक मला जाणवतो. मुळात हिंदी मालिकेचा ऑडियन्स हा मराठीपेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळे हिंदी काम करताना एकाच वेळी खूप जास्त रसिकांपर्यंत पोहचता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे बजेट. हिंदी मालिकांचं बजेट हे मराठी मालिकांपेक्षा तुलनेने जास्त असते. मराठीत विशेष शूट असेल तर दोन युनिट लावली जातात. मात्र हिंदीचं तसं नसतं, तिथे कायमच दोन युनिट कार्यरत असतात. त्यामुळे कलाकारांना कोणत्याही गोष्टीसाठी तडजोड करावी लागत नाही. हिंदीतली प्रत्येक गोष्ट ही भव्यदिव्य असते. दागिने, कपडे खूप रॉयल असतात. या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात असं मला वाटतं. इथे मला एक किस्सा शेअर करावासा वाटतो. एकदा 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या शूटसाठी मी काश्मीरला गेले होते. महाराष्ट्रीयन असल्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला लोक ओळखतातच. मात्र काश्मीरमध्ये मी गेल्यावर मला तिथले लोक ओळखतील याची कल्पनाही नव्हती. तिथल्या लोकांनी मला जणू काही आश्चर्याचा धक्का दिला. मला पाहून ते खूप खुश झाले. यावरुन मला हिंदी मालिकांची रिच कळली. काश्मीरमधल्या लोकांपर्यंत माझं काम या मालिकेच्या माध्यमातून पोहचत आहे, ते त्यांना आवडतं आहे हे मला त्या दिवशी कळलं. कलाकाराला रसिकांकडून कौतुकाची थाप मिळणे, त्यांचं प्रेम मिळणं हेच हवं असते. त्यादिवशी काश्मीरच्या लोकांच्या त्या प्रतिसादामुळे मी केलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटलं.
 
ब-याच वर्षांपासून तू मालिकांमध्ये काम करत आहेस. तुला या इंडस्ट्रीत झालेले बदल काही झालेत असे वाटते का ?
 
सध्या मालिकांमध्ये निरनिराळे प्रयोग होत आहेत. विशेषतः मराठी मालिकांमध्येही हे प्रयोग होत आहेत आणि ते रसिकांनाही भावतायत. मराठी आणि हिंदी भाषेचा प्रयोग करत 'काहे दिया परदेस' ही मालिका जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहचली. आता एकदा यशस्वी झालेला प्रयोग पुन्हा यशस्वी होईलच याची शाश्वती नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी नाविन्यपूर्ण गोष्टी आणि नवे प्रयोग होणं गरजेचं आहे. मी सुरुवात केली तेव्हा या सगळ्या गोष्टी नव्हत्या. मात्र आता हळूहळू चित्र पालटू लागलं आहे. त्यातच मी मराठीत काम करत राहिले असते तर कदाचित रसिकांचं प्रेम किंवा इतक्या लोकांपर्यंत पोहचू शकले नसते. 'पवित्र रिश्ता' ही मालिका आजही इंडोनेशियामध्ये सुरु आहे. तिथल्या रसिकांचे मला प्रतिक्रिया येतात. त्यामुळे खूप अभिमान वाटतो. केवळ भारतातच नाही तर परदेशातही लोक आपल्याला पाहतात ही गोष्ट खूप भारी वाटते.
 
तू निगेटिव्ह भूमिका साकारल्या आहेत. शिवाय इतर प्रकारच्याही भूमिका तू तितक्याच खुबीने निभावल्या आहेत. मात्र तुला कोणत्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात ?

तसं पाहायला गेले तर दोन्ही प्रकारच्या भूमिका करायला मला आवडतात. निगेटिव्ह असो किंवा मग चांगल्या शेड असलेल्या पॉझिटिव्ह भूमिका दोन्ही एन्जॉय करते. मात्र मी निगेटिव्ह भूमिका आजवर जास्त केल्या आहेत कारण तशाच भूमिका मला ऑफर झाल्या आहेत. निगेटिव्ह व्यक्तीरेखा साकारण्यात कलाकाराचा जास्त कस लागतो असं मला वाटते. मी ज्यावेळी निगेटिव्ह भूमिका साकारते त्यावेळी त्यात माझ्या सहकलाकाराचाही त्यात तितकाच वाटा असतो.माझ्या एक्शनवर त्याची रिएक्शन येते, त्यावेळी माझी व्यक्तीरेखा जास्त तिरस्कार करणारी होते. त्यामुळे माझी निगेटिव्ह भूमिका अधिक स्पष्टपणे आणि ठळकपणे रसिकांपर्यंत पोहचते. मला सगळ्याच प्रकारच्या भूमिका साकारणं आवडत असलं तरी माझं मन जास्त निगेटिव्ह भूमिकांमध्ये रमतं. स्क्रिप्ट आणि भूमिकेच्या मागणीनुसार चॉईस बदलत असते. जेव्हा मला रसिक भेटतात आणि सांगतात की तुम्ही ऑफस्क्रीन तर खूप चांगल्या प्रेमळ वाटता. मात्र ऑनस्क्रीन पाहताना तुमचा खूप राग येतो. त्यांच्या या प्रतिक्रियेवरुन मला त्यांच्या भावना कळतात. म्हणजे निगेटीव्ह भूमिकेमुळे त्यांना राग येतोच मात्र ती व्यक्तीरेखा त्यांना भावते.
 
सोशल नेटवर्किंग साईटवर तू एक्टिव्ह असते. फॅन्सशी संवाद साधत असते. मात्र सध्या सोशल नेटवर्किंगचा गैरवापर होत असल्याचे समोर येत आहे. यावर तुला काय वाटते ?

ज्यावेळी मी माझ्या करियरला सुरुवात केली तेव्हा सोशल नेटवर्किंग वगैरे काही नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष कुणी भेटले तर त्या रसिकांची मतं माझ्यापर्यंत पोहचायची. आता मात्र सोशल मीडियामुळे क्षणाक्षणाला रसिकांच्या प्रतिक्रिया येत असतात. नुकताच प्रसारीत झालेला भाग रसिकांना आवडला की नाही याबाबत रसिक सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यामुळे त्यांच्याशी थेट कनेक्ट होता येत. त्यांच्याशी संवाद साधताना वेगळीच मज्जा असते. अर्थात या सगळ्या गोष्टींना एक मर्यादा असावी. या गोष्टी मर्यादेपलीकडे जाऊ नये याचीही मी पुरेपूर काळजी घेत असते.
 
आजवर तू ब-याच भूमिका साकारल्या आहेस. मात्र तुला आवडलेली तुझी भूमिका कोणती ?
 
'पवित्र रिश्ता' या मालिकेत मी साकारलेली वर्षा ही भूमिका माझ्यासाठी कायमच फेव्हरेट असेल. कारण या भूमिकेला निरनिराळ्या शेड्स होत्या. आधी ती कॉलेजमध्ये जाणारी तरुणी होती. नंतर ती प्रेमात पडते, लग्नबंधनात अडकते, गर्भवती राहते आणि मग बहिणीच्याच मुलाला पळवून नेते. या भूमिकेला रसिकांनी भरभरुन दाद दिली. आजच्या काळातील तरुणी कुणाचंच ऐकत नाही, त्यांचं प्रतिनिधीत्व करणारी ती व्यक्तीरेखा होती असे मला वाटते. आजही रसिक मला वर्षा म्हणूनच ओळखतात. त्यामुळे हीच भूमिका माझ्यासाठी लाडकी भूमिका राहिल.
 

Web Title: Therefore, it is a negative role - Priya Marathe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.