"स्त्री असल्यानं पोर जन्मजात..", स्वप्नील राजशेखर यांची लेक नेट-सेट परीक्षेत उत्तीर्ण, केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:50 IST2025-09-04T12:50:07+5:302025-09-04T12:50:23+5:30
Swapnil Raajshekhar : स्वप्नील राजशेखर सोशल मीडियावर त्यांची मुलगी आणि अभिनेत्री कृष्णा राजशेखरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.

"स्त्री असल्यानं पोर जन्मजात..", स्वप्नील राजशेखर यांची लेक नेट-सेट परीक्षेत उत्तीर्ण, केलं कौतुक
स्वप्नील राजशेखर (Swapnil Raajshekhar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारुन त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. शेवटचे ते झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत पाहायला मिळाले. या मालिकेमध्ये त्यांनी चारुहासची भूमिका साकारली होती. ही मालिका बंद झाली असली तरी रसिकांच्या मनातील त्यांचं स्थान कायम आहे. ते सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर त्यांची मुलगी आणि अभिनेत्री कृष्णा राजशेखर(Krushna Raajshekhar)साठी खास पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.
स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर लेक कृष्णाचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, ''मैत्र हो, सुह्रुद हो…. एक आनंदवार्ता.. माझी कन्या कृष्णा (krushna rajshekhar) ही इंग्रजी विषयात UGC NET आणि SET या राष्ट्रीय व राज्यस्तरीय दोन्ही कठीण परिक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली… दोन नाटकांचे प्रयोग, ऑडियो ईंडस्ट्रीमधले प्रोजेक्टस, सोशल मिडीया प्रमोशन्स, अभिनय क्षेत्रातील उमेदवारी आणि बापाची फुल टाईम ॲटेंडंट ह्या सगळ्या जबाबदाऱ्या नीटस सांभाळून….
बरं, कथक विशारद आहे, जर्मन भाषेचा अभ्यास सुरु आहेच.. जर्मनीत जाऊनही शिकलीय…आता पीएचडी साठी प्रवेश घेतला आहे.''
त्यांनी पुढे म्हटले की, ''आपली पोर हुशार आणि सिन्सीअर असणं हे बापासाठी, संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी आहे… पण तरी मी पोरीला सल्ला दिला, म्हटलं “''दमानं गं… पणजोबा, आजोबा, बाप… सगळ्यांच्या वाट्याचं तू एकटीच शिकतेयस का काय ?!!!'' तशी हुशारी, कलागुण पुर्वापार आमच्यात आहेत… पण चिकाटी, सिन्सिॲरीटी, ध्येयासक्ती तिच्या आजी आणि आईकडुन तिच्यात आलीय… आणि ‘स्त्री’ असल्याने पोर जन्मजात अष्टावधानी, जबाबदार, सक्षम आहेच.. असं सगळं… तर असं घराव लायटींग….'' स्वप्नील राजशेखर यांच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.