स्तवन शिंदे रंगभूमीवर साकारतोय शिवरायांची भूमिका, पोस्ट शेअर करत म्हणाला - "कलाकार म्हणून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:14 IST2025-02-19T13:13:19+5:302025-02-19T13:14:06+5:30
स्तवन शिंदे (Stavan Shinde) छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका रंगभूमीवर साकारतो आहे. नुकतेच त्याचे गडगर्जना हे महानाट्य प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

स्तवन शिंदे रंगभूमीवर साकारतोय शिवरायांची भूमिका, पोस्ट शेअर करत म्हणाला - "कलाकार म्हणून..."
स्तवन शिंदे (Stavan Shinde) मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. त्याने आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्याने छोट्या पडद्यावरील 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिगरबाज मावळा शिवा काशिदची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका रंगभूमीवर साकारतो आहे. नुकतेच त्याचे गडगर्जना हे महानाट्य प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५व्या जयंतीनिमित्ताने नाटकाचे पोस्टर शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
स्तवन शिंदेने गडगर्जना नाटकाचे पोस्टर आणि प्रयोगाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने हे फोटो शेअर करत लिहिले की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत काम करण्याची आज संधी मिळाली गडगर्जना या महानाट्यात! मराठी रंगभूमीवर काम करण्याची मनोमन इच्छा होती.. ती संधी अश्या भूमिकेसाठी चालून येईल हे सारं माझ्यासाठी स्वप्नवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज साकारताना दिग्दर्शक वैभव महाडिक यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. कलाकार म्हणून मी यापुढेही महाराजांच्या भूमिकेस न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. श्री छत्रपती महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी!
गडगर्जना या नाटकाचे दिग्दर्शन वैभव अनंत महाडिक यांनी केले आहे. या नाटकात स्तवन शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडेने राजमाता जिजाऊ माँसाहेबांची भूमिका साकारली आहे. अभिनेता निखिल चव्हाण निवेदकाची भूमिका बजावत आहे. नरवीर तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत वैभव सातपुते झळकणार आहे. नृत्यदिग्दर्शन अमित घरत यांनी केले आहे.