शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर करीना कपूर चर्चेत, बेबोचं सौंदर्य नैसर्गिक की बोटॉक्सची कमाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:34 IST2025-07-01T15:32:29+5:302025-07-01T15:34:21+5:30
मनोरंजनसृष्टीत अनेक कलाकार सुंदर दिसण्यासाठी बोटॉक्स करतात.

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर करीना कपूर चर्चेत, बेबोचं सौंदर्य नैसर्गिक की बोटॉक्सची कमाल?
'काँटा लगा' गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं (Shefali Jariwala) निधन झालं. वयाच्या ४२व्या वर्षी शेफालीनं जगाचा निरोप घेतला. शेफालीचं असं अचानक जाण्याचं कारण प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. शेफालीचा मृत्यू अँटी-एजिंग ट्रिटमेंटमुळे झाल्याचं काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय. या घटनेनंतर अँटी-एजिंग उपचार, बोटॉक्स आणि सर्जरी हे चर्चेत आलंय. यातच अभिनेत्री करीना कपूरचं बोटॉक्स आणि सौंदर्य उपचारांबाबत दिलेलं जुनं वक्तव्य सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे.
करीना आता ४४ वर्षांची झाली असली तरी तू अजूनही खूप फिट आहे. तिच्या चेहऱ्यावर नेहमी तेज दिसतं. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बरखा दत्त यांच्याशी बोलताना करीनानं स्पष्टपणे म्हटलं होतं की, "मी बोटॉक्सच्या पूर्णपणे विरोधात आहे. मी स्वसंरक्षणाच्या बाजूने आहे, ज्यामध्ये निरोगी राहणं, चांगलं वाटणं आणि नैसर्गिक उपायांचा समावेश आहे. स्वसंरक्षण म्हणजे स्वतःच्या आणि तुमच्या प्रतिभेच्या रक्षणासाठी असतं, कारण तेच तुमचं खरं शस्त्र आहे".
करीना पुढे म्हणाली होती, "स्वतःची काळजी घेणं म्हणजे सुट्टी घेणं, मित्र-परिवारासोबत वेळ घालवणं, सेटपासून दूर राहून मनसोक्त जगणं. इंजेक्शन आणि सर्जरी करण्यापेक्षा हे जीवन जगणं जास्त महत्त्वाचं आहे आणि मी तेच करते". यासोबतच एका मुलाखतीमध्ये करीना हिनं 'आपलं वाढतं वय, आहे तसं स्वीकारा' हा मोलाचा सल्ला सर्वांना दिला होता.
.
पुढील तपास महत्त्वाचा
शेफालीच्या मृत्यूनंतर अंबोली पोलिसांची टीम तपास करत आहेत. अंबोली पोलिसांच्या निवेदनानुसार, शेफालीच्या घरातून अँटी-एजिंग गोळ्या सापडल्या असून, ती गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अँटी-एजिंग ट्रीटमेंट घेत होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी तिने शिळा भात खाल्ला होता आणि वैद्यकीय देखरेखीशिवाय अँटी-एजिंग इंजेक्शन घेतल्याचाही संशय आहे.पोलिसांनी आतापर्यंत १४ जणांचे जबाब नोंदवले असून, स्व-औषधोपचार, अन्नातून विषबाधा आणि इंजेक्शन्स यासंदर्भात तपास सुरू आहे. आता या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास काय धक्कादायक बाब उघड करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.