Exclusive: चिन्मय मांडलेकर प्रकरणावर 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेचं स्पष्ट मत; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 01:19 PM2024-04-22T13:19:29+5:302024-04-22T13:23:22+5:30

चिन्मय मांडलेकर प्रकरणावर आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेने तिचं स्पष्ट मत मांडलंय. (rupali bhosle, aai kuthe kay karte)

rupali bhosle talk about chinmay mandlekar decision that not playing shivaji maharaj role in movie | Exclusive: चिन्मय मांडलेकर प्रकरणावर 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेचं स्पष्ट मत; म्हणाली...

Exclusive: चिन्मय मांडलेकर प्रकरणावर 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेचं स्पष्ट मत; म्हणाली...

चिन्मय मांडलेकरने काल सोशल मीडियावर तो यापुढे छत्रपती शिवरायांची भूमिका करणार नाही, असा निर्णय सांगितला. मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने आलेल्या विचित्र प्रतिक्रियांचा सामना केल्यामुळे चिन्मयने हा निर्णय सांगितला. अखेर या प्रकरणी 'आई कुठे काय करते' मधील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने तिची स्पष्ट प्रतिक्रिया लोकमत फिल्मीला दिलीय. रुपाली म्हणते, "मी चिन्मय आणि नेहा यांच्या मताशी सहमत आहे. चिन्मयचा काल मी लोकमतच्याच पेजवर व्हिडिओ पाहिला. त्यात तो म्हणाला होता तुम्ही माझ्या कामाविषयी बोला. तुम्हाला आवडलं, नाही आवडलं त्याच्याविषयी मत असेल तर त्यासाठी आम्ही सगळे कलाकार प्रेक्षकांसाठी बांधील असतो."

रुपालीने पुढे सांगितलं, "तुम्ही आमच्या कामाची दाद, किंवा तुम्हाला काही आवडलं नाही तर त्याबद्दल राग तुम्ही व्यक्त करता, तेव्हा तितक्याच मोठ्या मनाने आम्ही हे स्वीकारायला सज्ज असतो. पण वैयक्तिक आयुष्यात आम्ही काय करायचं, आमच्या मुलांची नावं काय ठेवायची, काय वागायचं, काय खायचं याचं स्वातंत्र्य तुम्हाला कोणालाच नाही. हा अधिकार फक्त आमच्या पालकांना, आणि कुटुंबातल्या लोकांना आहे असं मला वाटतं. पब्लिक फिगर आहोत पब्लिक प्रॉपर्टी नाही, याचा जरा विसर पडलेला आहे."

रुपालीने पुढे सांगितलं की,  "आज सोशल मीडिया किंवा इंटरनेट इतक्या सहज उपलब्ध आहे की, कोणीही येतं आणि काहीही बोलून जातं. मला वाटतं हे वाईट आहे, आणि माझा या गोष्टीला आक्षेप आहे, विरोध आहे. कारण या ट्रोलींग मुळे खूप लोक आपण गमावले आहेत. याचा एक वेगळ्या पद्धतीचा  मानसिक परिणाम होतो. त्यामुळे ट्रोलिंग करणाऱ्या लोकांना या गोष्टीचं गांभीर्य कळलं पाहिजे. "

रुपालीने शेवटी सांगितलं,  "आणि चिन्मयने हा निर्णय घेतला असेल, की तो छत्रपती शिवरायांची भूमिका करणार नाही. तर त्याने योग्य विचार करून निर्णय घेतला असेल. कारण चिन्मय हा खूप विचारवंत अभिनेता आहे. आणि खूप छान कलाकृती त्याने प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. कारण आज प्रेक्षक म्हणून मी त्याचा सिनेमा बघते तेव्हा अभिमान वाटतो की असे कलाकार इंडस्ट्रीत आहेत. मला असं वाटतं त्याने हा निर्णय खूप विचार करून घेतला असेल, कारण तो तडकाफडकी निर्णय घेणारा कलाकार नाही. मला वाईट वाटतं की असा एक निर्णय घ्यावा लागलाय ट्रोलिंग करणाऱ्या लोकांमुळे."

(शब्दांकन: देवेंद्र जाधव)

Web Title: rupali bhosle talk about chinmay mandlekar decision that not playing shivaji maharaj role in movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.