'टीआरपी क्वीन' राखी सावंतची पुन्हा 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री? दुबईहून परतताच विमानतळावर केला मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 15:27 IST2025-10-15T15:25:10+5:302025-10-15T15:27:15+5:30
राखी सावंत 'Bigg Boss १९'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार? जाणून घ्या...

'टीआरपी क्वीन' राखी सावंतची पुन्हा 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री? दुबईहून परतताच विमानतळावर केला मोठा खुलासा!
बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) दुबईमध्ये काही महिने घालवल्यानंतर नुकतीच भारतात परतली आहे. अलिकडेच ती कलर्स वाहिनीवरील 'पती, पत्नी और पंगा' या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. पण, आता तिच्या 'बिग बॉस'मधील एन्ट्रीबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
राखी सावंतचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबई विमानतळावर पापाराझींशी संवाद साधताना तिने थेट 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करत असल्याचे सांगितले. व्हिडीओमध्ये राखी पापाराझींना उद्देशून म्हणते, "मी बिग बॉसच्या घरात जात आहे. मला मतदान करा". राखी सावंतच्या या खुलाशानंतर चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. खरंच राखी सावंत बिग बॉसच्या घरात जाणार का?' याबद्दल उत्सुकता वाढली आहे. राखी सावंतच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर तान्या मित्तलच्या जागी राखी सावंतला 'बिग बॉस'च्या घरात आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राखी सावंत जर खरंच बिग बॉसच्या घरात गेली तर ही तिची 'बिग बॉस'च्या घरातील चौथी एन्ट्री ठरू शकते. राखी सावंत पहिल्यांदा 'बिग बॉस सीझन १' (२००६) मध्ये दिसली होती. त्यानंतर ती सीझन १४ (२०२०) मध्ये आणि नंतर सीझन १५ (२०२१) मध्येही दिसली होती. राखीने स्वतःहून ही माहिती दिल्याने, आता ती लवकरच 'बिग बॉस'च्या घरात धुमाकूळ घालताना दिसेल का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.